‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ च्या माध्यमातून इतिहासाची माहिती नव्या पिढीला होईल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गेट वे ऑफ इंडिया येथे आता दर शनिवारी आणि रविवारी ‘शो’ चे आयोजन

मुंबई,२८ फेब्रुवारी /प्रतिनिधी :- ‘मल्टी मीडिया ॲण्ड साऊंड शो’ च्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या इतिहासाची माहिती मिळेल. २८ फेब्रुवारी १९४८ रोजी ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी भारत सोडून येथून गेली. गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे, यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

गेट वे ऑफ इंडिया येथे राज्य शासनाचा पर्यटन विभाग, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मल्टी मीडिया अॅण्ड साऊंड शो’ चा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.

            यावेळी केंद्रीय मंत्री (पेट्रोलियम व नैसर्गिक वायू) हरदीपसिंह पुरी यांनी लाइट ॲड साउंड शो शुभारंभ प्रसंगी व्हीडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.

            पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, इंडियन ऑईलचे अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य, निदेशक (विपणन) इंडियन ऑइल व्ही. सतीश कुमार,पर्यटन संचालनालयाचे संचालक, डॉ. बी. एन. पाटील यावेळी उपस्थित होते. भारतीय नौदलाच्या वाद्यवृंदाने राष्ट्रगीत, राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

             उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आज ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी भारत सोडून गेली. गेट वे ऑफ इंडियाचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीकोनातून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशभरात विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेट वे ऑफ इंडिया येथे ‘मल्टी मीडिया अॅण्ड साऊंड शो’ सुरु करण्यात येत आहे. ब्रिटीश सैन्याच्या भारतातून शेवटच्या प्रस्थानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आजपासून हा शो’ आयोजित केला आहे. याचा मुंबईतील नागरिक लाभ घेतील.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गेट वे ऑफ इंडिया मुंबईतील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. इंडियन ऑईल कंपनीने हा शो आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतिहासाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचेल. मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला हा लेझर शो उत्कंठावर्धक वाटण्यासाठी पर्यटन विभागाने अधिक प्रयत्न करावेत.

 ‘मल्टी मीडिया ॲण्ड साऊंड शो‘ अभिमानाची गोष्ट  – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी

            केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी म्हणाले की, दि. २८ फेब्रुवारी, १९४८ रोजी ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी (The Somerset Light Infantry) भारत भूमी सोडून गेली. या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मुंबई शहराची जगात एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळख आहे. संपूर्ण जगभरातील पर्यटक या शहराला वर्षभर भेटी देत असतात. गेट वे ऑफ इंडियाच्या वैभवात भर टाकण्यासाठी पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, केंद्र सरकार यांच्या समवेत झालेल्या सामंजस्य करारानुसार ‘मल्टी मीडिया ॲण्ड साऊंड शो’ इंडियन ऑईलमार्फत पुढील पाच वर्षे सुरू राहणार आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

            पर्यटन मंत्री श्री. लोढा म्हणाले की, आजच्या मल्टीमीडिया ॲण्ड साऊंड शो कार्यक्रमामुळे भारतातून शेवटचे इंग्रज बटालियन परत गेले हे सर्व भारतीयांना कळेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही मूळ संकल्पना आहे. आज हा कार्यक्रम सुरू करताना खूप आनंद होत आहे. दर शनिवारी आणि रविवारी हा शो सुरु राहणार असल्याचेही पर्यटन मंत्री श्री. लोढा म्हणाले.

इंडियन ऑईलचे अध्यक्ष श्री.वैद्य म्हणाले की, इंडियन ऑइल देशातील प्रत्येक माणसाशी जोडली गेलेली आहे. व्यापाराच्या पुढे जाऊन पर्यावरण संवर्धनासाठी इंडियन ऑइल काम करित आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात इंडियन ऑइल मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे मल्टीमीडिया अॅण्ड साऊंड शो च्या माध्यमातून जोडली गेली, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.येथे आयोजित केलेले शो प्रगतीशील भारत या संकल्पनेवर आधारित आहेत. स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे महत्त्व यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हा शो मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषेत असून हेडसेट घातल्यानंतर जपानी, जर्मन, फ्रेंच, रशियन या भाषेतून देखील ऐकता येणार आहे.