औरंगाबाद-नगर मार्ग संक्रांतीला खुला करू-सार्वजनिक बांधकाम विभागाकडून औरंगाबाद खंडपीठात निवेदन

औरंगाबाद,१० जानेवारी / प्रतिनिधी :-  औरंगाबादहून नगरकडे जाणारा दुपदरी मार्ग येत्या संक्रांतीला खुला करता येईल, असे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वकिलांनी मंगळवारी खंडपीठापुढे केले. खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांनी नगर-औरंगाबाद मार्गावरील पुलाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू करता येईल का, याची चाचपणी पोलीस आयुक्त, वाहतूक पोलिसांना विचारून व त्यांचा आढावा घेऊन करावी, अशी सूचना सरकारी वकिलांना केली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शहरातील विविध रस्ते, पुलांच्या कामांच्या संदर्भाने ॲड. रुपेश जैस्वाल यांनी पार्टी इन पर्सन जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी मंगळवारी खंडपीठापुढे झाली. यावेळी वरीलप्रमाणे निवेदन व खंडपीठाची सूचना करण्यात आली. शहरातील छावणी परिसरातील औरंगाबाद-नगर महामार्गावरील गोलवाडी उड्डाणपुलाचे काम १५ फेब्रुवारी २०२१ मध्ये १८ महिन्यात पूर्ण करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने यापूर्वी म्हटले होते. मात्र, अडीच वर्षांनंतरही गोलवाडी उड्डाण पुलाचे काम अपूर्णच आहे. खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. अरुण पेडणेकर यांनी यापुडे उड्डाणपुलाच्या कामास विलंब झाला तर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदार कंपनीस दंड लावण्यात येईल, असे सुनावले होते. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मंगळवारी खंडपीठापुढे औरंगााबाद-नगर महामार्ग संक्रांतीला खुला करण्याबाबतचे निवेदन केले. याप्रकरणी मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे, ॲड. राजेंद्र देशमुख, ॲड. अदवंत, ॲड. रुपेश जैस्वाल आदींनी काम पाहिले.

भुयारी मार्गावरील प्रकरणावर येत्या २० जानेवारी रोजी सुनावणी

शिवाजीनगर रेल्वे मार्गाजवळील भुयारी मार्गावरील प्रकरणावर येत्या २० जानेवारी रोजी सुनावणी घेतली जाईल, असे खंडपीठाने मंगळवारी स्पष्ट केले. शिवाजीनगर रेल्वे मार्गाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामाच्या व भूसंपादनाच्या संदर्भाने वेळोवेळी दिलेली स्मरणपत्रे खंडपीठापुढे मांडण्यात आली. यासंदर्भाने ३८ कोटींचा निधीही मंजूर करण्यात आल्याचे खंडपीठाला सांगण्यात आले.