इंटरनेटच्या माध्यमातून दिले जाणारे शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने परिपूर्ण असूच शकत नाही-डॉ. वाघमारे

औरंगाबाद,८ जून /प्रतिनिधी:- मराठवाडा जनता विकास परिषद व राज्यशास्त्र विभाग, पीपल्स कॉलेज नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 व 7 जून 2021 रोजी “कोरोना काळातील मराठवाड्याच्या विकासाची स्थिती” या विषयावर ऑनलाइन वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते.  पहिल्या दिवशी प्रथम सत्रात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व माजी राज्यसभा सदस्य डॉ. जनार्दन वाघमारे यांनी कोरोना काळातील मराठवाड्यातील उच्च शिक्षणाची स्थिती या विषयावर आपले विचार व्यक्त केले.  सद्यपरिस्थितीत इंटरनेटच्या माध्यमातून दिले जाणारे शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने परिपूर्ण असूच शकत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त करून, विद्यार्थी व शिक्षक यांच्या परस्पर संबंधातून दिले जाणारे शिक्षण हेच विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टिने आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. 

मुकुंद कुलकर्णी,

दुसऱ्या सत्रात मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य व ख्यातनाम उद्योजक श्री मुकुंद कुलकर्णी यांनी कोरोना काळातील मराठवाड्याच्या उद्योगांची स्थिती या विषयावर मत व्यक्त करतांना सद्य परिस्थितीकडे तरुण उद्योजकांनी संधी म्हणून बघावे.  तसेच शासकीय व प्रशासकीय संस्थांनी सकारात्मकता बाळगून मराठवाड्यातील उद्योगांना चालना द्यावी.       

दिनांक 7 जून रोजीच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रथम सत्रात निवृत्त शिक्षण संचालक श्री गोविंद नांदेडे यांनी कोरोना काळातील मराठवाड्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची स्थिती याविषयी चिंता व्यक्त करून शिक्षण संस्थांनी व शिक्षकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करण्याची आवश्यकता व्यक्त केली. 

डाॅ. अशोक बेलखोडे

याच दिवशीच्या दुसऱ्या सत्रात किनवट तालुक्यातील आदिवासींसाठी वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणारे डॉ. अशोक बेलखोडे यांनी कोरोना काळातील मराठवाड्यातील आरोग्याची स्थिती या विषयावर आपले विचार व्यक्त करून ग्रामीण जनतेमध्ये कोरोनाबाबत जागृती करून त्यांच्या आरोग्याकडे शासनाने व सामाजिक संस्थांनी गांभीर्याने बघितले पाहिजे व मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवली पाहिजे असे मत व्यक्त केले. 

शंकरराव नांगरे

याच दिवशीच्या तिसऱ्या सत्रात मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे तज्ञ संचालक व गोदावरी खोरे विकास मंडळाचे निवृत्त कार्यकारी संचालक श्री शंकरराव नांगरे यांनी कोरोना काळातील मराठवाड्याच्या सिंचनाची स्थिती या विषयावर आपले विचार मांडले.  याबाबत बोलताना त्यांनी विविध तालीकांद्वारे मराठवाड्याच्या सिंचनाची स्थिती श्रोत्यांना समजावून सांगितली.  

मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी अध्यक्षीय समारोप केला व मराठवाड्यातील जनतेमध्ये कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत जागृती करणे आवश्यक असून शासन दरबारी या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे सचिव प्राचार्य जीवन देसाई यांनी केले.  सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक सिद्धेवाड यांनी केले.  या वेबिनारच्या आयोजनात प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.  डॉ. बालाजी कोम्लपवार व प्रा. दामोदर थोरात व त्यांचे सहकारी यांनी वेबिनारच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.  सदर वेबिनारमध्ये मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातून मराठवाडा जनता विकास परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.