अल्पवयीन मुलीवर बलात्‍कार करुन तिला कुमारी माता बनविणाऱ्या आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी 

औरंगाबाद,१५ डिसेंबर / प्रतिनिधी :-लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्‍कार करुन तिला कुमारी माता बनविणाऱ्या आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी आणि साडेतीन हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए.एस. खडसे यांनी ठोठावली. विशेष म्हणजे पीडितेला नुकसान भरपाई मि‍ळावी यासाठी न्‍यायालयाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे प्रकरण वर्ग केले आहे. नितीन अशोक ऊर्फ पुंजाराम म्हस्‍के (२१, रा. महाकाळ, अंकुश नगर, ता. अंबड जि.जालना) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात १६ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली होती.जानेवारी २०१८ मध्‍ये पीडितेच्‍या एका नातेवाईकाने पीडितेची व आरोपीची ओळख करुन देत, आरोपीला तु खूप आवडली, व तो तुझ्यावर प्रेम करतो असे सांगितले होते. त्‍यानंतर आरोपीने पीडितेच्‍या वडिलांच्‍या मोबाइलवर फोन करुन तु मला फार आवडते, माझ्याशी प्रेम करते का, आपण लग्न करु असे म्हणाला. त्‍यावर पीडितेने होकार देत, मला दगा देवू नको अशी म्हणाली. त्‍यानंतर पीडितेचा नातेवाईक आणि आरोपी हे पीडितेच्‍या घरी आले होते. त्‍यावेळी पीडितेचे आई-वडील गावात गेले होते. तेव्‍हा आरोपीने पीडितेला एक मोबाइल दिला व दररोज फोन करता जा असे सांगुन दोघे निघून गेले.दोघे दररोज फोनवर बोलत होते. आरोपीने पीडितेला बोधेगाव खुर्द शिवारातील एका शेतात बोलावले. तेथे आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्‍कार केला. त्‍यानंतर आरोपीने पीडितेवर वारंवार बलात्‍कार केला.

मे २०१८ मध्‍ये पीडितेच्‍या घरी कोणी नसताना आरोपी पीडितेच्‍या घरी आला, त्‍याने तिला लग्नाचे फोटो दाखविण्‍याची मागणी केली. पीडितेने फोटो दाखविण्‍यासाठी काढलेल्या पेटीतील पीडितेच्‍या नावे असलेला दीड लाखांचा एफडी आरोपीने घेतला. पीडितेने एफडी परत करण्‍याची मागणी केली असता, त्‍याने तुझ्या आई-वडिलांना पैसे दिले आहेत, ते मला परत केल्यावर एफडी परत करेन असे सांगून तेथून निघून गेला. पीडितेने त्‍याला वारंवार विनवन्‍या करुन त्‍याने एफडी परत केला नाही आणि पीडितेला भेटण्‍यासाठी देखील आला नाही.

२६ नोव्‍हेंबर २०१८ रोजी पीडितेचे पोट दूखत असल्याने तिच्‍या आईने तिला परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी आणले होते, त्‍यावेळी ती सहा महिन्‍याची गर्भवती असल्याचे समोर आले. पीडितेने ही बाब आरोपीला सांगितली असता, त्‍याने तु तुझे बघुन घे, यानंतर मला फोन करु नको व माझे नाव घेवू नको असे सांगत फोन कट केला. २ डिसेंबर रोजी पीडितेला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. ४ डिसेंबर रोजी पीडितेने मुलीला जन्‍म दिला.या प्रकरणात वडोदबाजार पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

या प्रकरणात पोलिस उपाधिक्षक जगदिश पांडे यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवळी सहायक लोकाभियोक्ता बी.आर. लोया यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी नितीन म्हस्‍के याला पोक्सोच्‍या कलम ३ आणि ४ अन्वये ७ वर्षे सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंड, कलम ६ अन्‍वये १० वर्षे सक्तमजुरी, १ हजार रुपये दंड, कलम ५ (i)(ii) आणि ६ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी, १ हजार रुपयेदंड, कलम ८ अन्‍वये तीन वर्षे सक्तजमुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणुन सहायक फौजदार आर.एस. दवंगे यांनी काम पाहिले.