परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या 400 विद्यार्थ्यांचे  लवकरच लसीकरण

म्युकरमायकोसिस आजाराबाबत जनजागृतीवर भर देणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,३१ मे /प्रतिनिधी:-   कोविड-19 आजारातील रूग्ण बरे होण्याचा दर 95.14 टक्के आहे. मात्र म्युकरमायकोसिस (काळी बुरशीजन्य आजार) आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. हा आजार होऊ नये व झाल्यास तत्परतेने औषधोपचार मिळावा यासाठी डॉक्टरांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी तज्ज्ञांव्दारे कार्यशाळा, वेबिनारचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकप्रतिनिधींना आज दिली.

Displaying IMG_20210531_121209.jpg

जिल्ह्यातील कोविड-19 आजाराबाबत प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. खासदार भागवत कराड, जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके, आमदार अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाठ, आमदार अतुल सावे, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ आदींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यातील एकूण कोविड-19 परिस्थिती आणि प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत लोकप्रतिनिधींना सविस्तर माहिती दिली. यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील लसीकरण वाढत आहे. त्यावर अधिक भर देण्यात येत आहे. कोविड-19 च्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रूग्णांचा मृत्यूदर अधिक आहे. कोरोनातून रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. मात्र सध्या जिल्ह्यात 345 म्युकरमायकोसिसचे रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण 608 रूग्ण म्युकरमायकोसिसचे आढळले आहेत. त्यापैकी 206 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 57 मृत्यू झालेले आहेत. या रूग्णांना आवश्यक उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनबाबत नुकतीच आरोग्य विभागाच्या आयुक्तांशी चर्चा करून औरंगाबाद जिल्ह्यासाठी लागणाऱ्या इंजेक्शनबाबत पुर्नफेरवाटपाबाबत विचार करावा, अशी विनंती करण्यात आल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. त्याचबरोबर कोविड -19 रूग्णांची संख्या जिल्ह्यात कमी होत आहे. मात्र ग्रामीण भागातील कोविड-19 रूग्णांचा मृत्यूदर फेब्रुवारी 2021 पासून 51 टक्के असल्याने चिंतेची बाब आहे. प्रशासनाने कोविड-19 वर प्रतिबंधासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण, शोध मोहीम व योग्य उपचारावर भर दिलेला आहे. तसेच 360 रूग्णवाहिका, मुबलक प्रमाणात आवश्यक खाटांची उपलब्धता, गृहविलगीकरण, ऑक्सिजन साठवण क्षमता, ऑक्सिजन सिलिंडर रिफिलिंग, क्षेत्रीय भेटीबाबत श्री. चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली.

 आमदार शिरसाठ यांनी म्युकरमायकोसिस आजारावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इंजेक्शनबाबत विभागीय पातळीवरून वाटप करण्याबाबत विचार व्हावा. म्युकरमायकोसिस रूग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत, अशा सूचनाही केल्या. तर आमदार दानवे यांनी परदेशी शिक्षणासाठी जवळपास जिल्ह्यातून 400 विद्यार्थी जाणार असल्याने त्यांचे तत्काळ लसीकरण करण्यात यावे, अशी सूचना केली. त्यावर मनपा आयुक्त पांडेय यांनी लवकरच या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल, असे सांगितले.

खासदार कराड यांनीही विविध सूचना करत लॉकडाऊन काळातील व्यापाऱ्यांचा कर, वीज बाबत सवलत द्यावी, अशी मागणी केली. आमदार बागडे यांनी कोरोनावरील उपचार करताना रूग्णाला उपचाराचे दुष्परिणाम होणार नाहीत याबाबत डॉक्टरांनी संशोधनाचा आधार घेत उपचार करावा, असे सांगितले. आमदार सावे यांनीही लसीकरणाबाबत सूचना करताना ज्यांना खासगी रूग्णालयातून लसीकरण करणे शक्य आहे, त्यांना खासगी रूग्णालयातून लसीकरण करण्यास मुभा द्यावी. असे सूचवले.

घाटीच्या अधिष्ठाता डॉ. येळीकर, दंत महाविद्यालयाच्या डॉ. इंदूलकर यांनीही म्युकरमायकोसिस आजार व उपचाराबाबत यावेळी माहिती दिली. पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांनीही पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सांगितले.