कोरोना बाधित गंभीर रुग्णांना प्रथम प्राधान्याने खाटा उपलब्ध करुन द्याव्यात – जिल्हाधिकारी उदय चौधरी

औरंगाबाद दि. 13 :- कोरोना संसर्गात बाधित रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्या तसेच विशेष त्रास नसणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून  अशा रुग्णांवर कोवीड केअर सेंटरमध्ये यशस्वीपणे उपचार केले जात आहे. त्यामुळे  खाजगी रुग्णालयांनी आपल्या खाटा प्रथम प्राधान्याने गंभीर स्थितीतील कोरोना बाधित रुग्णांना उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खाजगी रुग्णांलयातील कोवीड-19 च्या उपचार सुविधांबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, उपायुक्त वर्षा ठाकूर, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांच्यासह खाजगी रुग्णालयांचे डॉक्टर्स, अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. चौधरी म्हणाले,कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रार्दुभावात गंभीर रुग्णांवर तातडीने आवश्यक उपचार होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्व खाजगी रुग्णालयांनी आपले आयसीयु बेड, व इतर सुविधा गंभीर रुग्णांना प्राधान्याने उपलब्ध होतील, याची खबरदारी घ्यावी. त्यासाठी लक्षणे दिसून येत नसलेल्या कोरोना बाधित ज्या रुग्णांना विशेष त्रास नाही अशा रुग्णांची व्यवस्थित तपासणी करावी. ज्या रुग्णांची तब्बेत कोवीड केअर सेंटरमधील उपचाराने चांगली होऊ शकते, अशा प्रकरणात त्या रुग्णांना सीसीसीमध्ये पाठवावे. तसेच जर त्या रुग्णांना होम क्वारंटाईन व्हायचे असेल आणि त्यांच्याकडे नियमानुसार आवश्यक सुविधा असेल  तर मनपा आयुक्त यांच्या मान्यतेने त्या रुग्णालयाने आपल्या देखरेखेखाली होम क्वारंटाईन करावे. सर्व मोठ्या रुग्णालयांसह लहान रुग्णालये जिथे 20-30 खाटांची सुविधा उपलब्ध असून कोरोना रुग्णांवर उपचार केल्या जात आहेत. त्या सर्वांनी आपल्या रुग्णालयातील खाटा ऑक्सीजन खाटा करुन घ्याव्यात. तसेच अशी रुग्णालये पूर्णपणे कोवीड रुग्णालय बनवावीत जेणेकरुन डॉक्टर्स आणि रुग्ण दोन्हींच्या दृष्टीने ते अधिक सोयीचे ठरेल.  या ठिकाणी ऑक्सीजन उपलब्धतेचे प्रमाण वाढवावे. त्यासाठी आवश्यकता असेल तर प्रशासन सहकार्य करेल, असे सांगूण जिल्हाधिकारी यांनी मोठया रुग्णालयांनी आपल्या कॅज्युलटी विभागात ही आयसीयु , ऑक्सीजन सुविधा उपलब्ध ठेवाव्यात . जेणेकरुन कोरोना बाधित रुग्णांना दाखल करण्यापर्यंतच्या कालावधीत किंवा खाटा उपलब्ध नसतील तर अशा स्थितीत दूसरीकडे पाठवण्याआधी रुग्णांवर आवश्यक उपचार करणे, तब्बेतीत स्थिरता आणणे शक्य होईल. ज्यामुळे रुग्णांची प्रकृती दुसऱ्या रुग्णांलयात जाईपर्यत नियंत्रणात राहण्यास मदत होईल. तसेच जर बाधित रुग्ण दाखल झाल्यावर त्याच्या तब्बेतीत जास्त प्रमाणात गुंतागुंत उद्भवण्याची शक्यता वाटल्यास तातडीने वेळेतच त्या रुग्णाला घाटीत पाठवावे . जेणेकरुन रुग्ण चांगल्या स्थितीत घाटीत दाखल होऊन वेळीच त्याच्यावर पुढील आवश्यक उपचार करणे शक्य होईल.

सर्व रुग्णालयांनी आपल्या येथील आयसीयु व्हेंटीलेटर, ऑक्सीजनसह इतर आवश्यक सुविधा औषधसाठा पूरक साहित्य यांच्या उपलब्धतेमध्ये वाढ करावी. तसेच यासाठी आकारण्यात येणाऱ्या दरांमध्ये एक निश्चित सुसुत्रता ठेवावी. जेणेकरुन देयकांमध्ये रुग्णांना तफावत आढळणार नाही. तसेच प्रशासनातर्फे देयक तपासणीसाठी लेखापरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांचे सहकार्य घेवून देयके योग्य प्रमाणात आकारल्या जातील याची खबरदारी घ्यावी. ॲन्टीजेन टेस्टींगद्वारे तासाभरात बाधित रुग्ण कळणे शक्य होत असल्याने खाजगी रुग्णालयांनीही या चाचण्या करण्यास सुरवात करावी . त्यासाठी आवश्यक किट प्रशासनाच्या मदतीने उपलब्ध करुन घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

कोरोना संसर्गांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने सर्व खाजगी डॉक्टर्सनी आपापले क्लिनिक सुरु ठेवणे बंधनकारक आहे. त्या ठिकाणी सर्व रुग्णांची तपासणी, औषधोपचार करण्याबाबत प्रशासनाने यापूर्वी निर्देशित केले आहे. मात्र तरीही ज्या खाजगी डॉक्टर्सनी अद्याप आपले दवाखाने सुरु केलेले नाहीत अशा, डॉक्टर्सच्या दवाखान्यांची  विशेष पथकाव्दारे तपसणी करण्यासाठीचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले .

मनपा आयुक्त श्री. पांडेय यांनी, सर्व खाजगी कोवीड रुग्णालयांनी त्यांच्याकडील उपलब्ध खाटांबाबतची अद्यावत आकडेवारी मनपा आरोग्य विभागात कळवावी तसेच बाधित जे रुग्ण लक्षणे आणि त्रास नसलेले आहेत,  त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करुन कोवी केअर सेंटरमध्ये जाण्याबाबत माहिती द्यावी, असे सूचित केले आहे.

यावेळी शहरातील खाजगी रुग्णालयांमधील कोरोना उपचारांच्या अनुषगाने पायाभूत सोयीसूविधंचा उपलब्ध खाटा, रुग्ण भरती, व इतर बाबींचा सविस्तर आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. यावेळी एमजीएम हॉस्पीटलचे डॉ. प्रविण सुर्यवंशी, धुत हॉस्पीटलचे प्रसाद पुंडे, डॉ. संजय सुर्वे, ॲपेक्स हॉस्पीटलचे डॉ.आशिष कठाळे, एशिअन हॉस्पीटलचे डॉ. शोएब हाश्मी, फिजीशीएन डॉ. विशाल ठाकरे, जे.जे. प्लस हॉस्पीटलचे डॉ. प्रशांत पाटिल, कमलनयन बजाज हॉस्पीटलचे डॉ.आलोक श्रीवास्तव, सिग्मा हॉस्पीटलचे डॉ. अजय रोटे, यांच्यासह संबंधित यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *