खा.शरद पवारांकडून तासाभरातच आ.सतीश चव्हाण यांच्या पत्राची दखल

Image
रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतीसंदर्भात दिले होते पत्र

औरंगाबाद,,१८मे /प्रतिनिधी :- खरीप हंगाम अगदी जवळ येऊन ठेपला असताना रासायनिक खतांच्या किमतीत काही ग्रेडमध्ये गोणीमागे 600 ते 700 रूपये इतकी भरमसाठ दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे खतांच्या वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपूरावा करून संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी खा.शरद पवार, खा.सुप्रिया सुळे यांच्याकडे केली होती. विशेष म्हणजे खा.शरद पवार यांनी तासाभरातच आ.सतीश चव्हाण यांच्या पत्राची दखल घेतली. खा.शरद पवार यांनी आ.सतीश चव्हाण यांच्या पत्राचा संदर्भ देत केंद्रीय रसायन व खते मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांना पत्र पाठवू खतांची दरवाढ कमी करण्यासंदर्भात स्वत: लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

         खतांच्या वाढलेल्या किमतीसंदर्भात आज दि.18 आ.सतीश चव्हाण यांनी मुंबई येथील सिल्व्हर ओक निवासस्थानी खा.सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन चर्चा केली. काही अपरीहार्य कारणास्तव शरद पवार यांची भेट न झाल्याने आ.सतीश चव्हाण यांनी शरद पवार यांच्यासाठी दिलेले पत्र खा.सुप्रिया सुळे यांच्याकडे दिले. खा.सुप्रिया सुळे यांनी देखील या गंभीर प्रश्नासंदर्भात मी स्वत: लक्ष घालणारच आहे तसेच हा विषयी मी तातडीने खा.शरद पवार यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे आ.सतीश चव्हाण यांना सांगितले.

Image

कोरोनाच्या संकट काळात आधीच शेतकर्‍यांच्या मालास भाव मिळत नसल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. त्यात खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ करून केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. 10.26.26 ची पन्नास किलोची गोणी 1175 रूपयांची होती. ती आता 1775 रूपयांना मिळणार आहे. जो डीएपी 1185 रूपयाला होता तो आता 1900 रूपयांना मिळणार आहे. अशाच प्रकारे इतर रासायनिक खतांचे दर सुध्दा वाढलेले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी खा.सुप्रिया सुळे यांच्या निदर्शनास आणून दिले. एकीकडे ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग व ‘लॉकडाऊन’मुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. डिझेलच्या भाववाढीमुळे शेती मशागतीचे नियोजन कोलमडून पडले आहे. ट्रॅक्टरची मशागत महागली असून नांगरणी, परेणी, रोटा, सरी पाडणे आदी कामे टॅक्टरने केली जात असल्याने शेतकर्‍यांना खर्चाचा मेळ बसवणे अवघड झाले आहे. त्यात या खतांच्या भाववाढीमुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी दिलासादायक पावले उचलणे गरजेचे असताना केंद्र सरकार दरवाढ करून शेतकर्‍यांचे कंबरडे मोडू पाहत आहे. एकीकडे ‘पीएम किसान योजने’च्या माध्यमातून शेतकर्‍यांना मदत द्यायची अन्‌ दुसरीकडे खतांच्या दरात वाढ करून ते काढून घ्यायचे असाच हा प्रकार आहे. त्यामुळे या ‘पीएम किसान योजने’चा उपयोग तरी काय? असा सवाल आ.सतीश चव्हाण यांनी पत्रात उपस्थित केला. बळीराजाने पेरायचे काय आणि खायचे काय? हाच मोठा प्रश्न आहे. त्यामुळे रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपूरावा करून संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी खा.शरद पवार, खा.सुप्रिया सुळे यांच्याकडे केली होती.