छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या नरवीर तानाजी मालुसरे क्रीडा संकुलाचे थाटात उद्घाटन

औरंगाबाद ,२६जून /प्रतिनिधी :-आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेने तीन एकर जागेत उभारणी केलेल्या क्रीडा संकुलाचे उद्घाटन संस्थेच्या विश्वस्त लता पद्माकर मुळे यांच्या शुभहस्ते झाले. 

उच्च दर्जाची सुविधा, दर्जेदार खेळपट्टी या खेळाडूच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी आणि सुविधा या क्रीडा संकुलात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पूर्ण सुविधा असलेले हे शहरातील सहावे क्रिकेट मैदान ठरणार आहे.  क्रिकेट मैदानालगतच बास्केटबॉल कोर्ट, कबड्डी, व्हॉलीबॉलचे मैदान तयार करण्यात आले आहे, सर्व मैदाने ही आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार करण्यात आली आहेत. ही मैदाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या खेळाकडे कल वाढावा, या हेतूने तयार करण्यात आले आहेत. आंतर महाविद्यालयीन तसेच अन्य क्रिकेट स्पर्धा या मैदानावर होऊ शकतील. अशा पद्धतीने मैदानाची उभारणी करण्यात आली आहे. कमीत कमी जागा व कमीत कमी खर्चात चांगल्या दर्जाचे क्रीडा संकुल तयार करण्यात आले आहे.

क्रिकेट मैदानाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे, व्हॉलीबॉलच्या मैदानाचे उद्घाटन विश्वस्त वीरेंद्र पवार, कबड्डी मैदानाचे उद्घाटन अरुण पेरे पाटील, बास्केटबॉल मैदानाचे उद्घाटन सदस्य रोहिणी रणजित मुळे व पार्थ मुळे यांच्या शुभहस्ते झाले. तर या क्रीडा संकुलाला अमूल्य मार्गदर्शन सचिव पद्माकरराव मुळे आणि विश्वस्त समीर मुळे यांचे लाभले.   

या क्रीडा संकुलाची तांत्रिक बाजू प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, पीच व हिरवळ आणि मैदानाची संपूर्ण व्यवस्था संतोष दहिहांडे आणि सिव्हिल काम राज तांबे पाटील यांनी सांभाळली. यावेळी जनार्धन कांबळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. सुभाष भोयर, डॉ. लता काळे, डॉ. डी. के. शेळके, डॉ. उल्हास शिंदे, सि. ए. योगेश राजापुरे, अशोक आहेर, संजय वाळुंज पाटील, कार्यालय अधिक्षक आणि विभागप्रमुख हजर होते. 

राजर्षी शाहू महाराज : सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ – पद्माकरराव मुळे

जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविणाऱ्या छत्रपती शाहू महाराज म्हणजेच यशवंतराव जयसिंगराव घाटगे यांची आज जयंती. आज कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे सचिव श्री. पद्माकरराव मुळे आणि सौ. लता पद्माकर मुळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आले.  
             यावेळी श्री पद्माकरराव मुळे यांनी आपल्या  छोटेखानी मनोगतात छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयीच्या जीवनपटावर प्रकाश टाकला. टोकाचा जातीभेद असणाऱ्या काळात १९१८ साली आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा त्यांनी राज्यात लागू केला.  छत्रपती शाहू महाराज  हे कृतिशील समाजसुधारक होते.  समाजातील जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि मागासलेल्या जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच बहुजनांमध्ये स्वाभिमान निर्माण करण्यासाठी, त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी  छत्रपती शाहू  महाराजांनी शिक्षण प्रसाराचे कार्य हाती घेतले. १९१६ साली प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा त्यांनी केला. या कायद्याची अंमलबजावणी नीट होण्यासाठी त्यांनी जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही अशा पालकांना १ रुपये दंडाची शिक्षा केली . मागासलेल्या जातींना विकासाची समान संधी मिळावी, यासाठी त्यांनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात शासकीय नोकऱ्यांमध्ये मागास जातींसाठी ५० % आरक्षणाची तरतूद केली 

असे त्यांनी सांगितले यावेळी संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे आणि विश्वस्त वीरेंद्र पवार, सदस्य रोहिणी रणजित मुळे. श्री. अरुण पेरे पाटील, पार्थ मुळे यांनी शुभेच्छा दिल्यात.