महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.नरेश गिते यांना निरोप

औरंगाबाद,३१ मे /प्रतिनिधी:- ज्येष्ठ आयएएस अधिकारी डॉ.नरेश गिते हे 38 वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेनंतर सोमवारी (31 मे) निवृत्त झाले. गेल्या ऑगस्टपासून ते महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. सोमवारी महावितरणच्या वतीने त्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी‍ डॉ.गिते यांच्या महावितरणमधील कारकिर्दीबद्दल गौरवोद्गार काढले. विशेषत:‍ महा कृषी ऊर्जा अभियानात डॉ.गिते यांनी अल्प काळात शेतकऱ्यांना थकबाकीमुक्त करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी वाखाणणी केली. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयात कोरोना प्रतिबंधक अटींचे पालन करून झालेल्या छोटेखानी कार्यक्रमास महवितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत, संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण, संचालक (वित्त) रवींद्र सावंत हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, नांदेड परिमंडलाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रवींद्र कोलप हे प्रत्यक्ष उपस्थित होते. यावेळी डॉ.गिते व त्यांच्या पत्नी जयश्री गिते यांचा महावितरणच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व संचालकांनीही डाॅ.गिते यांच्या महावितरणमधील कारकीर्दीवर प्रकाश टाकून त्यांच्या अनुभवाचा कंपनीला लाभ झाल्याचे नमूद केले.

डॉ.गिते यांनी प्रशासकीय सेवेत व महावितरणमध्ये काम करताना जनतेची सेवा करता आल्याचे समाधान व्यक्त केले. महावितरणमध्ये ९ महिन्यांच्या कारकीर्दीतही एक गाव एक दिवस मोहिमेतून गावातल्या वीज समस्या गावात सोडवल्या. मोहिमेत केलेल्या कामांतून वितरण रोहित्रांच्या नादुरुस्तीचे प्रमाण घटले. कृषिपंपांचे नादुरुस्त रोहित्र वेळेत बदलून देण्यात यशस्वी ठरलो. तसेच महा कृषी ऊर्जा अभियानाचे नेतृत्व करण्याची व्यवस्थापनाने टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पेलली, याचे समाधान असल्याचे डॉ.गिते म्हणाले. महावितरणच्या प्रत्येक कर्मचाऱ्यात काही सुप्त शक्ती आहे. ती प्रज्ज्वलित करून चांगले काम करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन दिले. ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचेही सहकार्य लाभले, असे डॉ.गिते म्हणाले.

1983 मध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ.गिते यांनी प्रशासकीय सेवेची सुरुवात केली. डॉ.गिते यांनी कारकीर्दीत मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, ग्रामविकासमंत्र्यांचे खासगी सचिव यांसह मंत्रालयातील विविध पदांवर उल्लेखनीय कामगिरी केली.