महाराष्ट्रातील ज्यू वारसा स्थळे पर्यटनासाठी खुली करणार – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा 

राज्यातील ज्यू वारसा स्थळांचा समावेश करण्यासंदर्भात पर्यटन महामंडळ – इस्त्राईल दरम्यान सहकार्य करार

मुंबई ,१५ डिसेंबर / प्रतिनिधी :- राज्यातील ज्यू वारसास्थळे पर्यटनाच्या नकाशावर यावीत यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मुंबई येथील इस्राईलचे महावाणिज्यदूत यांच्यासोबत या स्थळांच्या पर्यटनाबाबतच्या इरादा पत्रावर पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे मुंबई, ठाणे यांसह राज्यातील महत्वाची ज्यू -वारसास्थळांची जगभरातील पर्यटकांना ओळख होईल, असा विश्वास पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

आज मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात, मुंबईतील इस्राइलचे महावाणिज्यदूत कोबी शोशनी, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, इस्राइलचे राजकीय दूत अनय जोगळेकर यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री.लोढा म्हणाले, राज्यात अनेक शतकांपासून ज्यू लोकांचे वास्तव्य आहे. त्यांनी मराठी भाषा, संस्कृती आणि चालीरिती स्वीकारल्या आहेत. जगभरातील अनेक इस्रायली आणि ज्यू लोक पर्यटनासाठी मुंबईला भेट देतात आणि त्यांना त्यांच्या वडिलोपार्जित स्थळांना भेट देण्याची इच्छा असते. या उपक्रमाची माहिती राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावी तसेच यासाठी सर्व परवानग्या देण्यासाठी शासन सहकार्य करेल, या सहकार्यामुळे ज्यू वारसा जपला जाईल आणि महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल

पर्यटन सचिव सौरभ विजय म्हणाले, इरादा पत्रावर झालेल्या स्वाक्षरीमुळे राज्यातील विविध ज्यू वारसा स्थळांचा विकास करणे शक्य होणार आहे. लवकरच इस्राईलचे महावाणिज्यदूत आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मार्फत जेविश पर्यटन सुरु करण्यात येईल. मुंबई आणि ठाणे येथील सिनेगॉग आणि  सिमेट्रिज तसेच पनवेल, पुणे आणि अलिबाग येथील ज्यू वारसा स्थळांचा यामध्ये समावेश करण्यात येईल.

इस्रायलमध्ये भारतीय पर्यटन सर्किट विकसित करणार

कॉन्सुल जनरल कोब्बी शोशानी म्हणाले की, इस्रायलमध्ये भारतीय ज्यू समुदायांबद्दल आणि महाराष्ट्राच्या समकालीन इतिहासातील त्यांच्या योगदानाबद्दल जगभरातील ज्यूंमध्ये जागरूकता वाढवण्यास यामुळे मदत होईल. इस्रायलमध्ये भारतीय पर्यटन सर्किट विकसित करण्यासाठी असाच प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी, कृपया मुंबईतील इस्रायलच्या महावाणिज्य दूतावासातील अनय जोगळेकर यांच्याशी ९७६९४७४६४५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

पर्यटन पॅकेज बाबत माहिती देणार

एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी म्हणाल्या की, या इरादा पत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर, मुंबईतील इस्रायलच्या महावाणिज्य दूतावासाच्या मदतीने स्थानिक ज्यू समुदाय आणि ज्यू स्मारकांमध्ये त्यांच्या इतिहासाची आणि महत्त्वाची माहिती देणारे फलक लावून एमटीडीसी एक ते तीन दिवसांच्या प्रवासाचे अनेक कार्यक्रम तयार करणार आहे. तसेच टूर गाइड आणि हॉटेल्स इत्यादींसह पॅकेज म्हणून ऑफर देखील तयार करण्यात येतील.