जरुळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकांकडून  महिला शिक्षकांना मानसिक त्रास ; शिक्षक भारतीची कारवाईची मागणी

गटशिक्षणाधिकाऱ्यांनी बजावली कारणे दाखवा नोटीस

वैजापूर,१५ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील जरुळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सोमीलाल भागचंद जगदाळे यांच्याकडून महिला शिक्षकांना त्रास दिला जात असल्याची तक्रार पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. शिक्षक भारती या शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार दिली आहे.

महिला शिक्षकांच्या बाबतीत असभ्य वर्तनाची माहिती तोंडी प्रशासनाला दिली होती. मात्र त्यांच्या वर्तनात सुधारणा होण्याऐवजी त्रास देण्याचे प्रकार वाढत आहेत. परिपाठ सुरु असतांना महिला शिक्षकांना अपमानास्पद बोलणे, मनमानी प्रशासन चालवणे, वारंवार महिला शिक्षकांना कामाशिवाय ऑफिसमध्ये बोलावणे, शालेय कामकाज करतांना दादागिरीची भाषा वापरणे, टाचणी वही, हजेरी आदींवर सही करण्यासाठी शिक्षकांना ताटकळत ठेवणे, शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप वर आक्षेपार्ह मॅसेज पाठवणे, महिला शिक्षिका शिकवत नाहीत असा प्रचार गावात करणे असे प्रकार वारंवार होत असल्याने महिला शिक्षकांना मानसिक त्रास होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या तक्रारीची दखल घेत गट शिक्षणाधिकाऱ्यांनी जगदाळे यांना शिस्तभंगाची  कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत खुलासा करावा अशी नोटीस बजावली आहे.