नायगाव येथे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अभिवादन

सातारा,३ जानेवारी /प्रतिनिधी:- फक्त नायगावमध्येच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना मर्यादित न ठेवता देशभरात आणि जगभरात त्यांचे विचार व कार्य पोहचविले पाहिजे.सावित्रीबाईंचे जन्मगाव असलेल्या नायगावचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

सावित्रीबाई फुले  जयंती निमित्ताने नायगाव जि. सातारा येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,पंकज भुजबळ, प्रा. हरी नरके, बापूसाहेब भुजबळ, महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे, पंचायत समिती सभापती अश्विनी पवार, सरपंच पुनम नेवसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्ञान संकुल नायगाव येथे  महाज्योती या संस्थेच्या माध्यमातून  देशातील पहिली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय संरक्षण अॅकॅडमी स्थापन करून याठिकाणी एनडीए व स्पर्धा पूर्व परिक्षा निवासी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी येथील ग्रामस्थांची मदत देखील शासनास अतिशय उपयुक्त असणार आहे. या प्रशिक्षण संकुलासाठी व विविध बाबींचा विकास करण्यासाठी शासनाकडे 50 कोटी रुपयांचा आराखडा पाठविण्यात आलेला आहे.  यामाध्यमातून नायगाव येथे निवासी प्रशिक्षण संस्था, निवासी शाळा व अन्य बाबींचा विकास महाज्योती संस्थेच्या माध्यमातून करण्यासोबत नायगाव येथील   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही सुद्धा आंतरराष्ट्रीय स्वरूपाची अद्ययावत अशा प्रकारची शाळा महाज्योती संस्थेच्या वतीने विकसित करण्यात येईल. तसेच नायगावचा  विकास करणे व नायगाव येथे अद्यावयावत ज्ञानसंकुल उभे करण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही  त्यांनी यावेळी सांगितले.

सामान्य  माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याचे, त्यांना समान हक्क मिळवून देण्याचे काम महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले. त्याचे आभार मानण्यासाठी आपण या भूमीला वंदन करतो. या दाम्पत्याने सर्वांना समान हक्क मिळविण्यासाठी आयुष्य वेचले असल्याचेही श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायगावच्या सरपंच पूनम नेवसे यांनी केले.

सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या कामाला गती द्या – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या कामाला गती द्या – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या समोर उभारण्यात येत असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाची पाहणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

श्री. भुजबळ म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे येत्या आठवड्यात अनावरण करण्याचा मानस असून त्यासाठी पुतळा उभारणीचे काम गतीने पूर्ण करावे. सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल. पुतळा अनावरण प्रसंगी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन होईल याची काळजी घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

चबुतऱ्यावर पुतळा उभारणीचे प्रारंभीक काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित कामातही दर्जेदार बांधकाम साहित्याचा वापर करण्यात यावा. पुतळा परिसरातील सुशोभिकरण, प्रकाशव्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात यावी, असे सांगत ऐतिहासिक अशा विद्यापीठाच्या वारसा (हेरिटेज) इमारतीच्या दगडकामाशी सुसंगत असे पुतळ्याचे चबुतऱ्याचे दर्शनी भागातील काम करण्यात यावे, यासह विविध सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य संजीव सोनवणे, प्रा.हरी नरके, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, निबंधक डॉ. प्रफुल्ल पवार, मुक्त व दूरस्थ प्रशाला संचालक प्रा.वैभव जाधव, मराठी विभागप्रमुख प्रा. प्रभाकर देसाई, इतिहास विभागप्रमुख प्रा. बाबासाहेब दुधभाते, ईश्वर बाळबुधे, बापू भुजबळ, प्रित्येश गवळी आदी उपस्थित होते.