वैजापूर येथे तालुकास्तरीय आरोग्य जनसंवाद कार्यक्रमात ग्रामस्थांच्या तक्रारी

वैजापूर ,२२ जून/ प्रतिनिधी :-  राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये आरोग्यासाठी सामाजिक कृती प्रक्रिया या अंतर्गत तालुकास्तरीय आरोग्य जनसंवाद या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागत आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने अनेक सुविधा ग्रामीण भागातील  नागरिकांना मिळत आहेत. ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयांचे प्रश्न सुटण्यास साहाय्य होत आहे असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले. 

मराठवाडा ग्रामीण विकास संस्था व राज्य समन्वयक

संस्था-साथी सह पुणे व तालुका आरोग्य अधिकारी यांनी आयोजित तालुकास्तरीय जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गुरुनाथ इंदूरकर हे होते. जिल्हा समन्वयक अन्नपूर्णा ढोरे यांनी तालुक्यातून प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र,व ग्रामीण रुग्णालयाबाबत आलेल्या सूचना व तक्रारी सादर केल्या. या तक्रारींचे तालुका आरोग्य अधिकार, वैद्यकीय अधिकारी, बांधकाम खात्याचे अभियंता यांनी निवारण करून त्रुटीची पूर्तता आठ दिवसात करण्यात येईल असे आश्वासन दिले. जन आरोग्य समिती लवकर गठीत करावी, पुरेसा आरोग्य कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा, रुग्णालय इमारती त्वरीत  दुरुस्त कराव्यात, रुग्णांना पिण्याचे  शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे,आलेला निधी ज्या कामासाठी आला त्याच कामासाठी खर्च व्हावा ,रुग्णवाहिका दुरुस्ती करावी व रुग्णांना उपलब्ध करून द्यावी, रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे मागणी करावी, लाईट बिल त्वरित भरावे, वैद्यकीय अधिकारी, एएनएम यांनी मुख्यालयी थांबावे व सेवा द्यावी, तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून २८ उपकेंद्र आहेत. यासाठी फक्त १२ एएनएम आहेत,खूप कमी संख्या असल्याने एएनएमची पदे भरावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

पुरणगाव सरपंच हरी ठोंबरे यांनी पुरेशा आरोग्य कर्मचाऱ्याची मागणी केली. नारायण भोपळे, रमेश चव्हाण  व प्रभाकर जाधव यांनी ही ग्रामीण भागात  सर्व आरोग्य सोयी मिळाव्या अशी मागणी केली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरुनाथ इंदूरकर यांनी येत्या १५ दिवसात सर्व मागण्या पूर्ण होईल असे आश्वासन दिले. बापू वाळके यानी आभार मानले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास डुकरे(बोरसर),डॉ.वैशाली हजारी (लाडगाव), डॉ.रहेमान जोहिंद (गाढे पिंपळगाव), डॉ.पी.व्ही‌.नागडवाड ((भऊर), डॉ.शेख आमेर, (लोणी), डॉ.मुरमुरे (मनूर) तसेच जिल्हा समन्वयक अन्नपूर्णा ढोरे, सचिन दौड, सतीश नागुडे यांनी सहभाग नोंदविला.