आरक्षणाच्या दुसऱ्या टप्य्यात जरांगे यांची प्रकृती खालावली “मला बोलता येतंय तो पर्यंत चर्चेला या” सरकारला केलं आवाहन

आरक्षणाचा निर्णय जाहीर करा – पवार

जरांगेंनी काळजी घेण्याचं फडणवीसांचं आवाहन 

जालना ,२९ऑक्टोबर / प्रतिनिधी :-राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पुन्हा पेटला आहे. जालनेतील अंतरवली सराटी इथं मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे अन्न पाणी त्याग करून आमरण उपोषण सुरु आहे. जरांगे यांनी सरकाराला ४० दिवस दिले होते. पण सरकारनं कुठलंही पाऊल उचललं नाही. त्यामुळे राज्यात परत एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला.

आज अंतरवली सराटी या गावात मनोज जरांगे यांचा आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि आज त्याची प्रकृती खालावली आहे. तरीही त्यांनी उपचारांसाठी नकार दिला आहे. त्यांनी पहिल्या दिवसापासून कोणत्याही औषध उपचारासाठी नकार दिला आहे. मला बोलता येतंय तो पर्यंत चर्चेला या असं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून ५० टक्कयांच्या आत आरक्षण द्या या मागणीसाठी जरांगे यांनी उपोषण सुरु केलं होते. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून आज त्याची प्रकृती अधिक खालावली आहे. त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केल्यामुळे त्यांना नीट बोलता येतं नाहीं आहे. आरोग्य विभागाचं पथक इथं दाखल झालं असून त्यांनी उपचारासाठी नकार दिला आहे.

जरांगे यांनी आज काही प्रत्रकारांशी संवाद साधला मराठा बांधवानी एकजूट व्हा, फुटू देऊ नये महारष्ट्रात जिथं जिथं साखळी उपोषण आहे तिथं तिथं आमरण उपोषणाला सुरुवात करावी. प्रत्येक पोलीस ठाण्यात परवानगी अर्ज दया जेणेकरून सरकारला समजले राज्यात किती ठिकाणी उपोषण सूरु आहेत. आत्महत्या करू नका, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. सरकारने अजूनही काही संवाद साधला नाहीं आहे. माझ्या प्रश्नाची उत्तर दिली नाही आहेत. मला आता बोलता येतं नाही आहे. मला बोलायला त्रास होत आहे,असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

आरक्षणाचा निर्णय जाहीर करा – पवार

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारने कोणाचेही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केली. मनोज जरांगे यांच्या मागण्यांची सरकारने पूर्तता करावी आणि त्यांची प्रकृती व्यवस्थित राहावी, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असून मीही त्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे समजावून घेतले होते. केंद्र व राज्य सरकारने तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता होती. पण सरकारचा निर्णय लांबणीवर गेल्याने राज्यात संतापाचा वणवा पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी राज्यभरात आग्रही भूमिका घेतली जात आहे, असे पवार यांनी नमूद केले.

आरक्षणप्रश्नी राज्यपालांची भेट

खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , जितेंद्र आव्हाड आदींनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यात आंदोलन सुरू आहे. सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली.

जरांगेंनी काळजी घेण्याचं फडणवीसांचं आवाहन 

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांची टीम तेथे हजर आहे. शेवटी जीव हा अत्यंत महत्वाचा आहे. जरांगेंच्या सोबतच्या लोकांनी देखील त्यांची काळजी घ्यावी. स्वत: मुख्यमंत्री या विषयात लक्ष घालून आहेत. जे योग्य निर्णय आहेत ते झाले पाहिजे असा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे जरांगेंनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.