वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी केंद्रीयमंत्री नारायण राणे मध्यस्थी करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

मुंबई : गुजरातकडे वळलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे मध्यस्थी करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्वत: राणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यासंदर्भात नारायण राणे यांनी आज सकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी महाराष्ट्रात अनुकूल वातावरण आहे, राज्यातूनच कंपनीला जास्त सवलत दिली जाईल, असे मुद्दे एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडणार आहेत.हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरुन शिवसेना-राष्ट्रवादीने शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपकडून पलटवार करण्यात आला. मात्र आता मुख्यमंत्री शिंदेही हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात यावा, यासाठी आग्रही आहेत. नारायण राणे यांनी सकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली होती. त्यानंतर राणे हे शिंदे आणि फडणवीसांसह पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचे समजते.