जगाला आपले बनवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे योग-पंतप्रधान नरेंद्र मोदी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी केले संबोधित

न्यूयॉर्क :- तब्बल १८० देशांमध्ये योग दिवस साजरा करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएनमध्ये संयुक्त राष्ट्र मुख्यालय परिसरात आयोजित योग कार्यक्रमात योगासने करून योग दिवस साजरा केला. यामुळे देशातच नव्हे तर विदेशात देखील भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. आता संपूर्ण जगापर्यंत पोहोचण्यासाठी, संपूर्ण जगाला आपले बनवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे योग. जगामध्ये भारताची ओळख निर्माण करण्याचा मार्ग योगासने झाला, असे मला वाटते, असे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले.

योगासन करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी सर्वांचे आभार मानले. पीएम मोदी म्हणाले की, योग म्हणजे एकत्र येणे. ९ वर्षांच्या आठवणी ताज्या झाल्या, आज या विशेष कार्यक्रमात अनेक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. योग म्हणजे आपल्याला एकत्र आणणे. तुम्ही योगा कुठेही करू शकता, एकट्यानेही करता येईल, योग ही जीवनशैली आहे. हे पूर्णपणे कॉपीराइट मुक्त आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, येथे जवळपास प्रत्येक राष्ट्रीयत्वाचे लोक उपस्थित आहेत. योग म्हणजे सामील होणे, म्हणून तुम्ही एकत्र येत आहात. ही योगाच्या दुसर्‍या स्वरूपाची अभिव्यक्ती आहे. योग भारतातून आला आहे, ही जुनी परंपरा आहे. योगावर कॉपीराइट नाही. हे पेटंट आणि रॉयल्टी मुक्त आहे. योगामुळे तुमचे वय आणि तंदुरुस्ती टिकून राहते. ते पोर्टेबल आहे. फक्त निरोगी राहण्यासाठीच नव्हे तर स्वत:बद्दल आणि इतर लोकांप्रती आपुलकीच्या भावनेने योग करा, असंही मोदी म्हणाले.

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून 2023 रोजी न्यूयॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्र (UN) मुख्यालयाच्या नॉर्थ लॉन मध्ये   9 व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय योग दिन  कार्यक्रमाचे नेतृत्व केले.

‘वसुधैव कुटुंबकमसाठी योग ’, ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’, म्हणजेच ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’.  

या कार्यक्रमाला 135 पेक्षा जास्त देशांमधील हजारो योग प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, एका योग सत्रात इतक्या देशांच्या नागरिकांच्या सहभागाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित झाला. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचा एक व्हिडिओ संदेश देखील यावेळी प्रसारित करण्यात.

या कार्यक्रमाला, राजनैतिक क्षेत्रातले मान्यवर,अधिकारी,  शिक्षणतज्ज्ञ, आरोग्य व्यावसायिक, तंत्रज्ञ, उद्योग क्षेत्रातील धुरीण, माध्यम क्षेत्रातले मान्यवर , कलाकार, आध्यात्मिक नेते आणि योग अभ्यासक यासारख्या समाजाच्या सर्व स्तरांमधील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. यामध्ये 77 व्या संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष साबा कोरोसी, न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स, संयुक्त राष्ट्रांच्या उप महासचिव आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास गटाच्या अध्यक्ष अमिना जे. मोहम्मद यांचा समावेश होता.

योग सत्रापूर्वी, पंतप्रधानांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. भारताच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) अध्यक्षपदाच्या काळात डिसेंबर 2022 मध्ये याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधानांनी नॉर्थ लॉनवरील पीसकीपिंग मेमोरियल येथे आदरांजली वाहिली.