छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आदर्श :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

सार्वजनिक ठिकाणी एखाद लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील असं वक्तव्य करायचं आणि मग सारवासारव करायची याची जणू त्यांना सवयच

शिंदे गटाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांची नाराजी

औरंगाबाद, १९ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- राज्यपाल कोश्यारी आणि वाद हे समीकरण ठरलेलंच आहे. सार्वजनिक ठिकाणी एखाद लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील असं वक्तव्य करायचं आणि मग सारवासारव करायची याची जणू त्यांना सवयच झाली आहे.

आता त्यांनी आज पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असे बोलत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी उपस्थित होते.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना डी. लिट ही पदवी देण्यात आली.

याआधी देखील राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य वारंवार केली आहेत. राज्यपालाच्या या नवीन वक्तव्याचे आता काय पडसाद उमटणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

शिंदे गटाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांची नाराजी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे. छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होते पण ते जुन्या काळात असं कोश्यारी म्हणाले.  त्यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज हे देशाच आराध्य दैवत आहेत. राज्यपाल यांनी वक्तव्य काय केल हे माहीत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्याबद्दल बोलताना आदराने आणि सन्मान बोललं पाहिजे ही महाराष्ट्राची संस्कृती असल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर देखील उदय सामंत टीका केली आहे. स्वातंत्र्यवीर  सावरकर यांच्यावर टीका करण्या इतकं आपल्या देशांत कोणीही मोठं नाही. राहुल गांधी आपल्या यात्रेमध्ये भारत जोडण्यासाठी नाहीतर स्वतःच वजन कमी करण्यासाठी चालत आहेत अशी खोचक टीका उदय सामंत यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसची टीका 

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अंदाधूंद बोलण्याचा विकार राज्याचे महामहिम राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांना जडला आहे. यापूर्वीही त्यांनी केलेल्या वक्तव्यातून राज्यातील सामाजिक शांतता भंग पाडण्याचे काम झालेच.आजही महाराजांविषयी केलेला उल्लेख हा खेदजनक म्हणावा लागेल. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान हे कालही, आजही व सदैव आदर्शाचे आहे मात्र ऐवढ्या बौधिकक्षमतेपर्यंत पोहण्यास काहीजण अपवाद ठरतात हे वर्तमान स्थितीतील राज्यपाल पदाचेही दुर्भाग्य म्हणावे लागेल  अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केली आहे.