हुंडाबळी प्रकरणी आरोपी पतीसह सासू आणि सासऱ्यांना  प्रत्येकी दहा वर्षे सक्तमजुरी   

औरंगाबाद,१९ एप्रिल /प्रतिनिधी 

लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांतच विवाहीतेला कपड्याचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेवून असा तगादालावत तिचा मारहाण करुन छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून विवाहीतेने आत्महत्या केली. या हुंडाबळी प्रकरणी आरोपी पतीसह सासू आणि सासऱ्यांना  प्रत्येकी दहा वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली प्रत्येकी ३५ हजार याप्रमाणे एकूण एक लाख पाच हजारांचा दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. भिष्मा यांनी ठोठावली.

पती रामेश्र्वर उर्फ रमेश दत्तू पाचपुते (३०), सासरा दत्तू रामा पाचपुते (६०) आणि भिष्माबाई दत्तु पाचपुते (५५ सर्व रा. जळगाव मेटे, ता. फुलंब्री) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात निवृत्ती रामराव म्हसलेकर (५५, रा. म्हसला ता. बदनापुर जि. जालना) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीची मुलगी मृत राणी (२०) हिचे लग्न ६ मे २०१३ रोजी आरोपी रामेश्र्वर उर्फ रमेश पाचपुते याच्याशी झाले होते. लग्नाच्या थोड्याच दिवसांनी आरोपींनी कपड्याचे दुकान टाकण्यासाठी राणीला माहेरहून दोन लाख आण असा तगादा लावला. पैशांसाठी आरोपी राणीचा शारिरीक व मानसिक छळ, मारहाण करीत होते.आरोपी सासऱ्याची राणीवर वाईट नजर होती, त्याने वाईट हेतूने तिचा हात पकडला होता. या बाबत राणीने आई वडीलांना सांगितले होते. राणीने फिर्यादीला दोन लाख रुपये द्या खूप छळ होत आहे असे सांगितले होते. त्यावर फिर्यादीने राणीच्या पती व सासऱ्याला  कापूस विकल्यावर पैसे देतो असे सांगितले. त्यानंतरही आरोपी राणीला उपाशी ठेवून मारहाण करीत होते. १२सप्टेबर२०१३ रोजी राणीने फिर्यादीला फोन करुन सासरकडील लोक मारहाण करुन त्रास देत असून मला येथून घेवुन जा असे सांगितले. त्यावर फिर्यादीने दोन दिवसांत कापूस विकून पैसे आणून देतो असे सांगितले.

१३ सप्टेबर २०१३ रोजी  सकाळी सात वाजता गावातील शामराव म्हसलेकर याने फिर्यादीला फोन करुन सांगितले की, राणी सकाळ पासून घराबाहेर गेली आहे, तिचा  शोध घेतला मात्र ती सापडत नसल्याचे सांगितले. हे एकताच फिर्यादी हे नोतवाईकांसह जळगाव मेटे येथे आले. राणीची शोधा शोध केली असता आरोपीच्या शेतातील विहिरीत  राणी मृत अवस्थेत सापडली. तसेच विहिरीजवळ राणीने लिहलेली चिठ्ठी देखील सापडली. या प्रकरणात वडोदबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हृयाचा तपास करुन सहायक पोलिस निरीक्षक सुरवसे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. प्रकरणाच्या सुनावणीवेळी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतिष मुंडवाडकर सात साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात, सुसाईड नोट, फिर्यादीची साक्ष आणि १२ सप्टेबर २०१३ रोजी केलेल्या कॉल डिटेल महत्वाची ठरले.  दोन्ही बाजुंच्या युक्तिवाद व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने वरील तिघा आरोपींना भादंवी कलम ३०४ (ब) अन्वये प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी, दहा हजार रुपये दंड, कलम ३०६ अन्वये सात वर्षे सक्तमजुरी पाच हजार रुपये दंड, कलम ४९८ (अ) एक वर्षे सक्तमजुरी, पाच हजार दंड, हुंडा प्रतिबंधक कायद्याचे कलम ३ अणि ४ अन्वये प्रत्येकी पाच वर्षे सक्तमजुरी १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

तर प्रकरणात दाखल गुन्ह्यात मृताची  नणंद स्वाती पाचपुते आणि दिर कैलास पाचापुते यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.या  प्रकरणात मुंडवाडकर यांना रामेश्र्वर इंगळे आणि पैरवी अधिकारी नईम यांनी मदत केली.