खुनाच्या आरोपात जन्मठेप झालेल्याचा औरंगाबाद खंडपीठात जामीन मंजूर

औरंगाबाद,२० ऑक्टोबर /प्रतिनिधी :- जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील बत्सर येथील जन्मठेपेची शिक्षा झालेल्या बाळकृष्ण सदाशिव पाटील यांचा १५ हजार रुपायाच्या जात मुचालक्यावर जामीन मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद  खंडपीठाचे न्यायमूर्ती आर जी अवचट आणि न्यायमूर्ती आर एम जोशी यांनी दिले आहेत.
जामीन मंजूर करताना न्यायालयाने निरिक्षण नोंदवले की, घटनेतील व्यक्तीचा मृत्यू आरोपीमुळे झालेला नाही. खटला प्रलंबित असताना आरोपी जामिनावर होता. तसेच प्रकरणाची सुनावणी नजिकच्या काळात होणार नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन हा जामीन मंजूर करण्यात येत आहे.
बत्सर येथे सख्ख्या बहीण भावामध्ये जमिनीच्या हिश्याच्या वाटणीतून वाद झाले होते. त्यातून आरोपीने चाकूने वार करून फिर्यादीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. पारोळा पोलीस ठाण्यात भादवि कलम ३०७, ४५२ अन्वये गुन्हा नोंद केला होता. चौकशीअंती अंमळनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने बाळकृष्ण पाटील याला खूनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
त्यानंतर बालकृष्ण सदाशिव पाटील यांनी अ‍ॅड् अमोल चाळक पाटील यांच्यामार्फत औरंगाबाद  खंडपीठात फौजदारी अपील व जामीन अर्ज दाखल केला असता युक्तिवाद तसेच कागदपत्रांची शहनिशा करून न्यायालयाने बालकृष्ण पाटील यांना अपिलाचा निर्णय लागेपर्यंत जामीन मंजूर केला.