परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालयास 50 एकर जागा देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी-सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई ,२० ऑक्टोबर /प्रतिनिधी :- ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी शासन प्रयत्नशील असून आरोग्य व्यवस्थेचे विस्तारीकरण होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावेत व त्यावर कार्यवाही करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी केल्या. परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालयास 50 एकर जागा देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. भारतीय वैद्यकीय परिषदेने निश्चित केलेल्या शिफारशीनुसार वैद्यकीय महाविद्यालयास जागा उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी प्रस्ताव सादर करताना आवश्यक कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

मंत्री श्री. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात विविध बैठका झाल्या. त्यावेळी ते बोलत होते.बैठकीस आमदार संजय कुटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसचिव दिलीप गावडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. साधना तायडे, संचालक नितीन अंबाडेकर, उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, अवर सचिव दीपक केंद्रे आदी उपस्थित होते.

संग्रामपूर ग्रामीण आरोग्य रुग्णालयातील पदभरती, यंत्रसामग्री याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करावा. या प्रस्तावाला शासनाकडून तत्काळ मान्यता मिळेल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. सावंत यांनी दिल्या.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणी वर्धन करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला शासनाकडून तत्काळ मान्यता मिळेल यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.धुळे जिल्ह्यातील साक्री येथील रुग्णालयाबाबतचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. आमदार मंजुळा गावित यांनी याबाबत बैठकीत माहिती दिली. साक्री तालुक्यातील जनतेसाठी आरोग्य व्यवस्था सक्षम करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.