घाटीतील विविध विकास कामांचे आ.सतीश चव्हाण यांच्या हस्ते उद्‌घाटन

औरंगाबाद,१८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- औरंगाबाद शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी) परिसरात आ.सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नातून झालेल्या विविध विकास कामांचे उद्‌घाटन मंगळवारी आ.सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

          औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी) परिसरातील मुलींच्या वसतीगृह इमारती समोरील रस्ता, वर्ग-1 कर्मचार्‍यांच्या वसाहती समोरील रस्ता, ग्रंथालय इमारती शेजारील रस्ता, मुलांच्या वसतीगृह इमारतीच्या मागील बाजूचा रस्ता, प्राणी गृहाच्या समोरील रस्ता आदी रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यासंदर्भात जिल्हा नियोजन विकास कार्यक्रमा अंतर्गत सन 2021-22 वर्षात आ.सतीश चव्हाण यांनी 50 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला होता. तसेच घाटीतील जैविक कचर्‍यासाठी शेडचे बांधकाम करणे, मार्ड विद्यार्थी निवासस्थानासमोर प्रतिक्षालय बांधकाम करणे, सुक्ष्म जीव विभागाकरिता स्वच्छतागृह बांधकाम करण्यासाठी 12 लाखाचा आमदार निधी दिला होता. या सर्व रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे काम मागील महिन्यात पूर्ण झाले. सदरील विकास कामांचे उद्‌घाटन आ.सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.वर्षा रोटे-कागीनाळकर, उप अधिष्ठाता डॉ.काशिनाथ गरकल, डॉ.भारत सोनवणे, डॉ.विजय कल्याणकर, डॉ.शुभा जवर, घाटीच्या अभ्यागत समितीचे सदस्य ऍड.इकबालसिंग गिल, नारायण कानकाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता के.एम.सय्यद आदींची उपस्थिती होती. कोविड काळात देखील आ.सतीश चव्हाण यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात विविध वैद्यकीय यंत्रसामुग्री खरेदीसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला होता.

          आ.सतीश चव्हाण यांनी उद्‌घाटनानंतर अधिष्ठातांच्या दालनात घाटीतील विविध अडीअडचणी, समस्या जाणून घेतल्या. तसेच यासंदर्भात लवकरच वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेणार असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी सांगितले.