निवृत्तीच्या एक दिवसानंतरची वेतनवाढ त्या पाेलिसांना द्यावी:औरंगाबाद  खंडपीठाचे राज्य शासनाला आदेश

औरंगाबाद ,१७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-पाेलिसांना दरवर्षी १ जुलैपासून मिळणारी नवीन वेतनवाढ (नाेशल इन्क्रिमेंट) एक दिवस आधी म्हणजे ३० जून राेजी निवृत्त झालेल्या जळगाव 

पोलिस विभागातील याचिकाकर्त्या कर्मचाऱ्यांनाही मागील थकबाकीसह देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद  खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांनी राज्य शासनाला दिले आहेत. 

याप्रकरणी जळगाव येथील रमेश एकनाथ सूर्यवंशी व इतर साेळा जणांनी  विष्णू मदन पाटील यांच्यामार्फत रीट याचिका दाखल केली आहे. याचिकेतून गृहविभागाचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, पाेलिस विभागाचे नाशिक येथील विशेष सहसंचालक, गृहविभाग मुंबईचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जळगाव पाेलीस अधीक्षक, उपअधीक्षक यांना प्रतिवादी करून नाेटीस बजावण्यात आली हाेती. याचिकाकर्ते हे जळगाव पाेलिस दलातून ३० जून या तारखेला निवृत्त झाले आहेत. या निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्त झालेले वर्ष  २०१४ ते २०२० असे वेगवेगळे असले तरी पाेलिसांना १ जुलै राेजी वेतनवाढ मिळत असल्याने त्याच्या एकच दिवस आधी निवृत्त झाल्यामुळे याचिकाकर्ते पोलिस हे वेतनवाढीच्या लाभापासून वंचित राहत हाेते. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीवेतनातील लाभावरही परिणाम हाेत हाेता. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस  नियम ३६ नुसार वेतनवाढीचे लाभ देण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी विनंती रीट याचिकेच्या माध्यमातून केली हाेती. खंडपीठाने ही विनंती मान्य केली. .