पत्‍नीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या चालकाचे अपहरण करुन त्‍याचा निर्घूण खून :आरोपीला जन्मठेप

औरंगाबाद,३० ऑगस्ट  /प्रतिनिधी :- नगरसेवक निवडणूकीत उभ्‍या पत्‍नीचा प्रचार करणाऱ्यासाठी सोबत घेतलेल्या चालकाचे आपल्याच पत्‍नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे उघडकीस आल्यानंतर चालकाचे अपहरण करुन त्‍याचा निर्घूण खून केल्याची घटना तब्बल सात वर्षांपूर्वी घडली होती. गुन्‍ह्यातील मुख्‍य सुत्रधार तथा आरोपी मुकेश सुखबीर लाहोट (रा. हर्षनगर) याला दोषी ठरवून जिल्हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही.एस. कुलकर्णी यांनी जन्‍मठेप आणि विविध कलमांखाली दोन हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा मंगळवारी ठोठावली.

सन २०१५ मध्ये पार पडलेल्या महानगर पालिका निवडणुकीत भीमनगरमधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर मुकेश लाहोटची पत्नी उभी होती. तिच्या प्रचारासाठी लाहोटने चालक अल्ताफला सोबत घेतले होते. निवडणूकीदरम्यान, अल्ताफ आणि लाहोटमध्ये वाद झाला होता. त्यामुळे अल्ताफने त्याच्यासोबत प्रचार करणे सोडून दिले होते. त्याचप्रमाणे अल्ताफचे  लाहोटची पत्नी ज्योतीसोबत अनैतिक संबंध जुळले होते. हा प्रकार लाहोटला समजला होता. त्यामुळे लाहोट आणि अल्ताफमध्ये नेहमी खटके उडायचे. घटनेच्‍या काही दिवसांपुर्वी लाहोटने अल्ताफला बोलावून घेत मुंबईला जायचे असल्याचे सांगितले होते. अल्ताफला सोबत घेतल्यानंतर त्याला मारहाण केली होती. जखमी अवस्थेत घरी पोहोचलेल्या अल्ताफला मिनाक्षी यांनी विचारणा केली. तेव्हा त्याने आपल्याला लाहोट आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केल्याचे सांगितले होते. दरम्यान, २१ मार्च २०१६ रोजी रात्री अल्ताफचे अपहरण करत मुकेश लाहोट, संतोष प्रभाकर नरवडे, सनी सतपाल राणा, विराज सुरेंद्र सौदागर, चंद्रकांत राजू शिर्के यांनी खून केला होता. यानंतर लाहोटच्या स्कार्पिओ कारमधून (एमएच-२०-बीसी-७९९९) अल्ताफचा मृतदेह पहूरनजीक असलेल्या वाकोद येथील बंद पडलेल्या आम्रपाली ढाब्याच्या सिमेंटच्या हौदात फेकून दिला होता. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.

आरोपीला जन्‍मठेप, दोन हजार रुपये दंड

गुन्‍ह्यात तपास अधिकारी गुन्‍हे शोखेचे निरीक्षक अविनाश अघाव यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र न्‍यायालयात सादर केले. खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता बी.आर. लोया यांनी २१ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्‍यात मयताचा भाऊ, मयताचा मामा, व इतर साक्षीदारांची साक्ष महत्‍वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी मुकेश लाहोट याला दोषी ठरवून भादंवी कलम ३०२ अन्‍वये जन्‍मठेप आणि एक हजार रुपये दंड, कलम ३६४ अन्‍वये पाच वर्षे सक्तजमुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तर गुन्‍ह्यातील इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

खटल्यात सरकारच्‍या वतीने बी.आर. लोया तर निर्दोष सुटका झालेल्यांच्‍या वतीने राजेश काळे आणि प्रकाश उंटवाल यांनी काम पाहिले.