वैजापूर तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीवर प्रशासक

वैजापूर,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यात 25 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्याच्या कार्यकाळाची मुदत संपुष्टात आली आहे.ग्रामपंचायतीचे कारभाराची जबाबदारी प्रशासकांकडे सोपवण्यात आली.

राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी 31 मे 2022 या कालवधीतील मतदार यादी ग्राह्य धरुन अंतिम मतदार यादी निश्चित करण्याची तयारी स्थानिक प्रशासनाने सुरु केली आहे. एकूण 77 प्रभागातील  215 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 13 ऑक्टोबर रोजी निवडणूकीस पात्र ग्रामपंचायत क्षेत्रात प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.त्यावर हरकती व सूचना नोंदवण्यासाठी 18 ऑक्टोबर पर्यतची मदत देण्यात आली असून अंतिम मतदार यादी 21 ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच पदाची निवडणूक थेट मतदारांमधून होणार असल्यामुळे गावपातळीवर दिपावली नंतर ग्रामपंचायत निवडणुकीचा तीव्र धुराळा उडणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत महालगाव, पानवी बुद्रुक / वक्ती, अव्वलगाव / हमरापूर,  बाबतरा,  बेलगाव , भग्गाव, डागपिंपळगाव, गोळवाडी / मिरकनगर, हनुमंतगाव, हिंगणे कन्नड, हिलालपूर / कोरडगाव, कनकसागज, कविटखेडा /बिरोळा, कोल्ही , खरज / तितरखेडा, खिर्डी हरगोविंदपूर, माळीघोगरगाव, नादी, नांदूरढोक / बाभुळगावगंगा, पाराळा, पुरणगाव, रोटेगाव टुनकी, तिडी / मकरमतपूरवाडी, वांजरगाव असे 25 ग्रामपंचायतीचे एकूण 77 प्रभागातील 215 जागासाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.मतदार यादी कार्यक्रमासाठी स्थानिक प्रशासनाने 21 तलाठी कर्मचा-याची नियुक्ती केली. 

वैजापूर तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक कार्यकाळाची मुदत संपुष्टात आल्यामुळे सरपंच पदाचा रिक्त कारभाराची अतिरिक्त जबाबदारी सांभाळण्यासाठी ग्रामविकास विभागाकडून प्रशासक म्हणून ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रभारी गटविकास अधिकारी एच. आर. बोयनर यांनी दिली. 

सरपंचपदाची निवड थेट मतदारातून होण्याची शक्यता

ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमात सरपंचपदाची निवड थेट मतदारांमधून होण्याची शक्यता निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली.सर्व ग्रामपंचायत निहाय सरपंचपदाचे आरक्षण  जाहीर झाल्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांकडून जोरदार हालचाली सुरु होतील.