वैजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जाधव यांना 15 हजार रुपयांची लाच घेताना पकडले

औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधकविभागाची कारवाई

वैजापूर,१९जुलै /प्रतिनिधी :- शेतात मोहगणे वृक्ष लागवड करण्याकरिता रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान मंजूर करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेतांना वैजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कैलास तुकाराम जाधव (52 वर्ष) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पकडले.
तालुक्यातील म्हस्की येथील एका शेतकऱ्याने शेतात मोहगणे वृक्ष लागवड करण्याकरिता रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान मंजूर करण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कैलास तुकाराम जाधव यांच्याकडे पाठपुरावा केला होता. गटविकास अधिकारी जाधव यांनी अनुदान मंजूर करण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी त्यांच्याकडे केली. तडजोडीअंती 15 हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र शेतकऱ्याला लाच देण्याची इच्छा नव्हती त्यामुळे या शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली.
औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ.राहूल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस अधीक्षक मारुती पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक दिलीप साबळे, पोलीस नाईक भीमराव जिवडे, दिगंबर पाठक, पोलीस शिपाई थिटे यांच्या पथकाने सापडा रचून तक्रारदार शेतकऱ्यांकडून 15 हजारांची लाच स्वीकारताना गटविकास अधिकारी कैलास जाधव यांना रंगेहात पकडले.
जाधव हे पंचायत समितीचे सहायक गटविकास असून गटविकास अधिकारी यांचा अतिरिक्त कार्यभार सध्या त्यांच्याकडे आहे. तीन वर्षानंतर ते सेवानिवृत्त होणार आहेत.