संजरपूरवाडी येथे बेकायदेशीररित्या विविध रंगाचे धार्मिक झेंडे लावले ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वैजापूर,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील संजरपुरवाडी येथे वस्ती शाळेसमोरील चौकात लोखंडी पाईपवर झेंडे लावून जिल्हाधिकारी यांचा  जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सहा जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली. रविवारी सकाळी हा प्रकार  उघडकीस आला होता.यातील संशयित आरोपीनी जिल्हा अधिका-यांचा जमावबंदी आदेशाचा अवमान करुन चौकात लोखंडी पाईपवर धार्मिक झेंडे लावण्याची बेकायदेशीर कृती केली होती. या प्रकरणात तलाठी विरराघू वायसळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रताप नरसिंग गोमलाडू, घनशाम त्रिंबक  नायमाने, बापू सुधनवा शिंदे रा.संजरपुरवाडी, वेणुनाथ रावसाहेब बागुल, गौतम बाजीराव त्रिभूवन व संतोष आबा गायकवाड सर्व रा. नालेगाव या सहा जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस नाईक योगेश झाल्टे हे करत आहे.