उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गुरुग्राम : समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांचे निधन झाले आहे. ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मुलायम सिंह यांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होता. त्यातच ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ते ‘नेताजी’ या नावाने प्रसिद्ध होते.

५५ वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले मुलायम सिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी इटावा जिल्ह्यातील सैफई येथे झाला. त्यांनी राज्यशास्त्रात एमए केले. १९६७ मध्ये यूपीमधील जसवंत नगरमधून आमदार निवडून आल्यानंतर ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही. ते आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि सात वेळा निवडून येऊन लोकसभेचे खासदार झाले. १९९६ मध्ये त्यांना संयुक्त आघाडी सरकारमध्ये संरक्षण मंत्री होण्याची संधीही मिळाली.

पंतप्रधानांसह अनेक नेत्यांकडून शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलायम सिंह यादव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘मी मुख्यमंत्री असताना मुलायम सिंह यादव यांच्याशी माझा अनेक वेळा संबंध आला. मी नेहमीच त्यांची मते ऐकण्यासाठी उत्सुक असायचो. त्यांच्या निधनामुळे दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि लाखो समर्थकांसोबत माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.’

शरद पवार यांची प्रतिक्रिया

शरद पवार यांनी मुलायम सिंह यांच्या निधानवर शोक व्यक्त करत म्हटले आहे की, लोहियांच्या विचारसरणीवर मुलायम सिंह यादव यांनी राजकीय वाटचाल केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर त्यांनी देशाच्या राजकारणातही लक्ष दिले. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली. सगळ्या विरोधकांनी एकत्र यावे अशी इच्छा होती. मुलायम सिंह यादव यांच्या निधनाने वैयक्तिक नुकसानही झाले आहे. देशातील समाजवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक मोठा अध्याय संपला – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

‘श्री मुलायमसिंह यादव हे देशाच्या आणि विशेषतः उत्तर प्रदेश राज्याच्या राजकारणातील एक धुरंधर नेते होते.  व्यापक जनसंपर्क व संघटन कौशल्यामुळे त्यांची राजकारणावरील पकड कायम राहिली. उत्तम संसदपटू असलेल्या मुलायमसिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून उत्तम काम केले होते. आपण उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य होण्यापूर्वीपासूनच आपला मुलायमसिंह यादव यांचेशी घनिष्ठ परिचय होता. सर्व पक्षातील लोकांशी त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्या निधनामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक मोठा अध्याय संपला आहे. दिवंगत मुलायमसिंह यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोकसंवेदना श्री अखिलेश यादव तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना कळवतो’’, असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या संदेशामध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली

समाजवादी पक्षाचे संस्थापक, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या निधनाने देशाच्या राजकारण, समाजकारणातील एक धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दांत शोक व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘मुलायमसिंह यांची राजकीय कारकीर्द संघर्षशील आणि वैशिष्ट्यपूर्ण राहिली.  पक्षाची स्थापना, संघटन बांधणी ते देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांनी आपला ठसा उमटवला. देशाच्या राजकारणात त्यांनी धुरंधर आणि मुत्सद्दी नेतृत्व म्हणून ओळख मिळवली. त्यांचे देशाच्या समाजकारण, राजकारणातील योगदान सदैव स्मरणात ठेवले जाईल. ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली’ असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.