मधुलिका रावत यांच्या मनात सैनिकांच्या पत्नींविषयी खूप आपूलकी

नवी दिल्ली,८ डिसेंबर/प्रतिनिधी:-जनरल बिपीन रावत यांचा आणि त्यांच्या पत्नीचाही यामध्ये करुण अंत झाला. मधुलिका रावत यासुद्धा अपघाताक्षणी जनरल राव यांच्यासोबत त्याच हेलिकॉप्टरमध्ये होत्या. एका कार्यक्रमासाठी गेले असता त्यांच्या हेलिकॉप्टरला कुन्नूरच्या जंगलात मोठा अपघाता झाला आणि ही धक्कादायक बातमी सर्वांना हादरा देऊन गेली. 

बिपीन रावत हे 63 वर्षांचे होते. रावत हे कुटुंबच प्रचंड शूर. रावत यांचे वडील एल एस रावत हे देखील सैन्यातच होते. त्यांच्या कुटुंबातील अनेकजण सैन्यात होते. रावत यांचं बालपण सैनिकांमध्ये गेलं. देशाची सेवा आणि सुरक्षेसाठी झोकून देणं, स्वत:ला समर्पित करणं हे त्यांच्या रक्तातच होतं. विशेष म्हणजे रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत या देखील प्रचंड संवेदनशील होत्या. त्यांनादेखील सैन्यदिलाविषयी, सैनिकांविषयी प्रचंड आत्मीयता होती. सैन्य म्हटलं की लढाई, शत्रूशी दोन हात करणं, शत्रूवर विजय मिळवणं, देशसेवेसाठी स्वत:ला झोकून देणं आणि त्यामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करणं हे आलंच. देशाच्या सीमेवर आज लाखो सैनिक भर उन्हात, थंडीत दिवस-रात्र उभे असतात. या जवानांप्रती त्यांच्या पत्नी आणि कुटुंबियांप्रती मधुलिका यांच्या मनात खूप कळवळा आणि पोटतिडकी होती. त्यासाठीच त्या सैन्यातील जवानांच्या पत्नी आणि लहान मुलांसाठी काम करायच्या. त्यांचं समुपदेशन करायच्या. त्यांनी या कार्यात आपल्याला झोकून दिलं होतं. त्या आर्मी वाईव्हस वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षा होत्या. मधुलिका यांच्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मधुलिका यांनी दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदवी मिळवली होती. त्या शिक्षणाच्या आधारावर त्यांनी सैनिकांच्या अनेक कुटुंबांना आधार दिला. सैनिकांच्या पत्नींचा मनातला उत्साह वाढवला. त्यांना प्रोत्साहन दिलं.

मधुलिका रावत यांचं मोठं समाजकार्य

मधुलिका या दिवंगत राजकारणी मृगेंद्र सिंह यांच्या कन्या होत्या. त्या मध्य प्रदेशातील शहडोल येथील मूळ रहिवासी होत्या. मधुलिका यांनी AWWA या संस्थेमार्फत लष्करातील जवानांच्या पत्नी, मुले आणि आश्रित यांच्यासाठी प्रचंड काम केलं. त्यांनी शहीद जवानांच्या पत्नींसाठी तसेच दिव्यांग मुलांसाठी वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम आयोजित केले होते. त्यांनी शेकडो सैनिकांच्या पत्नींना स्वालंबनाचे धडे दिले. त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यासाठी त्यांनी महिलांना ब्युटीशियन कोर्सेससह टेलरिंग, विणकाम आणि बॅग मेकिंगचे शिक्षण घेण्याचं आवाहन केलं. त्यासाठी तशा कोर्सेसच्या कार्याक्रमांचं आयोजनही केलं. तसेच त्यांनी अनेक लष्करी जवानांच्या कुटुंबातील महिलांना ‘केक्स आणि चॉकलेट्स’ बनवण्यासाठी प्रोत्साहित केलं.

बिपीन रावत आणि मधुलिका रावत यांना दोन मुली

देशसेवेसाठी स्वत:ला वाहून दिलेल्या शूर बिपीन रावत आणि मधुलिका रावत यांना दोन मुली आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचं नाव कृतिका रावत आहे. त्यांची लहान मुलीचं शिक्षण सुरु आहे. या दोन्ही मुलींना आपल्या आई-वडिलांचा अभिमान होता. इतके समृद्ध कर्तृत्वावन आई-वडिलांचं एकाचवेळी निधन होणं ही प्रचंड दुर्देवी बाब आहे. परमेश्वर या दोन्ही मुलींना आणि रावत यांच्या इतर कुटुंबियांना या दु:खाला सामोरं जाण्यासाठी बळ देवो, अशी प्रार्थना आता देशभरातून केली जातेय.