‘स्वारातीम’ विद्यापीठास अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे ११ कोटी मंजूर

नांदेड ,२० सप्टेंबर  /प्रतिनिधी :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळेतील उपकरणे खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडे रीतसर प्रस्ताव सादर करण्यात आला होता.या प्रस्तावाच्या माध्यमातून आंतरविद्याशाखीय संशोधनासाठी प्रेरणा मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने विद्यापीठातील सेंट्रल इन्स्ट्रुमेशन सेंटर फॉर मल्टीडिसिप्लेनरी रिसर्च अँड इनोव्हेशन या विभागास उपकरणे खरेदी करण्यासाठी ११ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 

कोरोना काळात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोरोना लॅब चालविणारे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे. याची जाणीव ठेवून शासनाने प्रोत्साहन म्हणून सदर रक्कम मंजूर केलेली आहे.महाराष्ट्रातील इतर विद्यापीठापेक्षा सर्वात जास्त रक्कम या विद्यापीठासमंजूर केलेली आहे. 

विद्यापीठाने संशोधनाला चालना मिळावी संशोधनास सर्व मूलभूत सोयी मिळाव्यात. नवीन समाजाभिमुख संशोधन व्हावे, यासाठी हैद्राबाद येथील भारत सरकारच्या ऑटोमिक एनर्जी विभागांतर्गत ऑटोमिक मिनरल डिव्हिजन आणि हैदराबाद येथील इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओसियनोग्राफी या नामवंत रिसर्च सेंटरला विद्यापीठाचे संशोधन केंद्र स्थापन केले आहे. अशाप्रकारे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राबाहेर व राज्याबाहेर संशोधन केंद्र असणारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे पहिलेच विद्यापीठ आहे. याबरोबरच विद्यापीठाने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर शैक्षणिक संशोधनासाठी सामंजस्य करार केलेले आहे. या सर्व सुविधा व अत्याधुनिक उपकरणाचा लाभ परिसर, उपपरिसर, संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थी, संशोधक, शिक्षक व उद्योजकांना होणार आहे. या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे संशोधन व नवोपक्रमांना चालना मिळणार आहे. तरी याचा उपयोग सर्वांनी करून घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले आहे. 

विद्यापीठाच्या परिसरात, उपपरिसरात व संलग्नित महाविद्यालयांमध्ये संशोधनासाठी अत्यावश्यक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे संशोधन विद्यार्थी व प्राध्यापकांना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. ही बाब महाराष्ट्र शासनाने लक्षात घेऊन सदर निधी मंजूर केलेला आहे. या निधीमधून अत्याधुनिक उपकरणाची खरेदी करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, रामनस्पेक्ट्रोस्कोप, फ्लुरिसेन्स स्पेक्ट्रोस्कोप, घनता व ध्वनीगती मीटर, विस्कोमीटर, रिफक्टोमीटर, कॅड सॉफ्टवेअर, व फ्लुरोसेन्ट मायक्रोस्कोप इत्यादी उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत.हे अत्याधुनिक उपकरणे संशोधक विद्यार्थ्यांसह उद्योग, कारखानदारी, तंत्रज्ञान क्षेत्रासाठी उपयुक्त असे ठरणार आहे.संशोधनांतर्गत विविध पदार्थाच्या नमुण्याचे प्रकरण जलद व अल्पदरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या मल्टी डिसिप्लनरी रिसर्च अँड इनोव्हेशन या केंद्राचा वापर होणार आहे.

कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या प्रयत्नातून त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल विद्यापीठाचे प्र-कुलगुरूडॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे,विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता  डॉ. अजय टेंगसे, प्र. वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, नवोपक्रम नवसंशोधन विभागाचे संचालक डॉ. राजाराम माने, सेंटरचे संचालक डॉ. गजानन झोरे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंहपरिहार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, कार्यकारी अभियंता तानाजी हुसेकर यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक व अधिकारी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.