महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमुळे युवक महोत्सव दोन दिवस पुढे ढकलला

९ ते १२ ऑक्टोबर २०२२ दरम्यान होणार युवक महोत्सव

नांदेड ,२० सप्टेंबर /प्रतिनिधी :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी नांदेड येथे दि. ७ ते १o ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये आयोजित केला होता. परंतु  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमुळे  हा युवक महोत्सव २ दिवस पुढे ढकलण्यात आला असून, आता युवक महोत्सव ९ ते १२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये होणार आहे. तरी सहभागी होणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी आपल्या प्रवेशिका २२ सप्टेंबर २०२२ पर्यंत विद्यार्थी विकास विभागात सादर कराव्यात. 

कोरोना कहराच्या काळानंतर तब्बल दोन वर्षांनी  विद्यापीठाचा हा आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव होत आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवासाठी ‘आजादी का अमृत महोत्स’ च्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रचेतना २०२२’ असे समर्पक नाव देण्यात आले आहे. ‘राष्ट्रचेतना २०२२’ या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवामध्ये एकूण २८ कला प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, कलावंत यामध्ये सहभागी होणार आहेत.  

विद्यार्थी कलावंतासाठी युवक महोत्सव हे हक्काचं कलापीठ असते. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिकाधिक वाव मिळावा व उत्साही वातावरणात हा महोत्सव पार पडावा या दृष्टीने विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्वच महाविद्यालयांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव व आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पवार यांनी केले आहे. ‘राष्ट्रचेतना २०२२’ या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवासाठी शोभायात्रेचा विषय ‘लढा स्वातंत्र्याचा… गाथा बलिदानाची’ हा ठेवण्यात आलेला आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी १) स्वातंत्र्याची ७५ वर्ष :काय कमावले ? काय गमावले ? २) संस्काराविना शिक्षण विनाशाचे लक्षण. ३) कैफियत शेतकऱ्याची. हे तीन विषय ठेवण्यात आलेले आहेत. वादविवाद स्पर्धेसाठी ‘आजची प्रसार माध्यमे सामान्यांचा आवाज बनली आहेत /नाहीत’  हा विषय ठेवण्यात आलेला आहे .