ज्येष्ठ साहित्यिक प्रा.तु.शं.कुळकर्णी यांचे निधन

नांदेड ,१० एप्रिल /प्रतिनिधी ज्येष्ठ साहित्यिक आणि सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबादचे माजी मराठी विभागप्रमुख प्रा.तु.शं.कुळकर्णी यांचे आज दि.१० एप्रिल रोजी दुपारी नांदेड येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह दान करण्यात आला.पत्रकार संजीव आणि राजीव कुळकर्णी यांचे ते वडील होत.

एक निष्णात प्राध्यापक व संवेदनशील लेखक म्हणून ते सुपरिचित होते.’तृणाची वेदना’, ‘ग्रीष्मरेखा’, ‘अखेरच्या वळणावर’ हे त्यांचे कथासंग्रह आणि ‘कानोसा’ हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांचे अनुवादित साहित्य प्रसिद्ध आहे. अनेक नियतकालिकांतून त्यांनी लिखाण केले. ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कविता’ या ग्रंथाचे त्यांनी साहित्य अकादमीसाठी संपादन केले होते. त्यांनी कथा काव्य आणि समीक्षा लिहीली. प्रा.प्रकाश मेदककर यांनी त्यांच्या निवडक साहित्याचे संकलन – संपादन केले आहे. प्रतिष्ठान या नियतकालिकाशी ते अनेक वर्षे निगडीत होते. परिषदेच्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. मसापने त्यांचा जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता.नरहर कुरुंदकर यांचे ते निकटचे स्नेही.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या ‘प्रतिष्ठान’ मासिकाचे संपादकपद त्यांनी पंधरा वर्षे भूषविले होते. मसापच्या कार्यवाहपदाची जबाबदारी त्यांनी दीर्घ काळ सांभाळली. तसेच अ. भा. मराठी साहित्य महामंडळावरही त्यांनी प्रतिनिधित्व केले. ‘मसाप’च्या उभारणीत कुलकर्णी यांची मोलाची भूमिका राहिली.साहित्याचे सुजाण रसिक – लेखक त्यांच्या अध्यापनातून घडले. स.भु.ची उज्ज्वल परंपरा वृद्धिंगत करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे