वैजापूर पालिकेच्या स्थायी समिती व विषय समित्यांची 19 सप्टेंबर रोजी निवड ; कार्यक्रम जाहीर

वैजापूर,१४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर नगरपालिकेच्या स्थायी समिती व विषय समित्यांची रचना करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण  यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार 19 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभा बोलाविण्यात आली आहे.
नगरपालिकेच्या फुले- आंबेडकर सभागृहात ही विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी माणिक आहेर  हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील. नगरपालिकेच्या विषय समिती व स्थायी समितीच्या सदस्यांचे नामनिर्देशन आणि सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

विषय समित्यांच्या सदस्यांचे नामनिर्देशन करणे – पीठासीन अधिकारी मान्यताप्राप्त पक्ष किंवा गटाचे संख्याबळ विचारात घेऊन त्यांच्या नेत्यांशी विचारविनिमय करून संख्याबळाच्या प्रमाणात सदस्यांचे नामनिर्देशन करतील.सभापती पदाकरिता नामनिर्देशन दाखल करणे – उक्त पदासाठी निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्या संबंधित समितीचा सदस्य आपले नामनिर्देशन पत्र  पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे विशेष सभा बैठकीच्या दोन तास आधी दाखल करतील. त्यांनतर पीठासीन अधिकारी नामनिर्देशन पत्रांची करतील व  नामनिर्देशित उमेदवारांची यादी वाचून दाखवतील. वैधपणे नामनिर्देशित  केलेल्या उमेदवारांची नावे वाचून दाखविल्यानंतर उमेदवारी मागे घेण्याकरिता पीठासीन अधिकारी 15 मिनिटांची वेळ देतील. उमेदवारी मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर पीठासीन अधिकारी हे उमेदवारी मागे घेतलेल्या उमेदवारांची नवे वाचून दाखवतील.आवश्यकता भासल्यास सभापतींची निवड करण्यात येऊन पीठासीन अधिकारी निकाल घोषित करतील. उपाध्यक्ष ज्या समितीचे पदसिध्द सभापती असतील ती समिती वगळून विषय समितीच्या सभापतीपदाची निवड होईल. विषय समितीच्या सभापतींची निवड  झाल्यानंतर नगरपालिकेच्या कलम 64 प्रमाणे स्थायी समितीची रचना पीठासीन अधिकारी करतील.