वैजापूर पालिकेने शहरातील रस्त्यांच्या कडेला उभ्या राहणाऱ्या हातगाड्या व अतिक्रमणे काढली

वैजापूर,१४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-दोन-तीन दिवसांपूर्वी नवीन भाजी मंडई समोरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली. या अपघाताला फळविक्रेत्यांनी हातगाड्या लावून केलेले अतिक्रमणच कारणीभूत ठरल्याचा आरोप शहरातील सर्व स्तरातील नागरिकांनी केला. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी पालिका व पोलिस प्रशासनाने धडक कारवाई करीत रस्त्याच्या कडेला ठाण मांडून बसलेल्या फिरते अतिक्रमण व विक्रेत्यांना गाशा गुंडाळण्यास भाग पाडले. मात्र ‘या कारवाईचा असर किती दिवस ?’ याबाबत वैजापूरकरांमध्ये खल सुरू आहे . 

शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास येवला रस्त्यावरील नवीन भाजी मंडईसमोर भरधाव ट्रकने दुचाकीने जाणाऱ्या महिलेला पाठीमागील बाजूने धडक दिली. या धडकेत महिला  ट्रकखाली चिरडून  जागीच ठार झाली तर त्यांचे सासरे गंभीर जखमी झाले होते . घटना घडताच शहरातील अनेकांनी समाज माध्यमांवर रस्त्यालगत फळविक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप केला. याबाबत दखल घेत रविवारी सकाळी पालिका प्रशासनाने दवंडी देत कुणीही रस्त्यावर दुकाने थाटू नयेत अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा विक्रेत्यांना दिला होता . यानंतर सोमवारी पालिका मुख्याधिकारी भागवत बिघोत, सहायक पोलिस निरीक्षक विजय नरवडे यांनी ताफ्यासह नवीन भाजीमंडई तसेच शहरातील शनी मंदीर परिसरासह मध्यवर्ती भागातील रस्त्यावर दुकाने थाटणाऱ्या विक्रेत्यांची अतिक्रमणे काढली. याशिवाय भविष्यात पुन्हा अतिक्रमण केल्यास कुणाचीही मुलाहिजा न बाळगता कायदेशीर कारवाई करू असा इशाराही मुख्याधिकारी बी. यु. बिघोत यांनी अतिक्रमणधारकांना दिला.