बँकेत भरणा करण्यासाठी जाणाऱ्या पेट्रोल पंप व्यवस्थापकाची 4 लाख रुपयांची बॅग पळवली ; वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथील प्रकार

वैजापूर, २ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-बॅंकेत भरणा करण्यासाठी जाणाऱ्या पेट्रोल पंप व्यवस्थापकास चार लाख रुपयांना लुटल्याची घटना सोमवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास विरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत लाडगाव रस्त्यावर घडली. याप्रकरणी तीन अनोळखी दुचाकीस्वारांविरोधात वाटमारीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर- लाडगाव रस्त्यावर शुक्रा पेट्रोल पंप असून या पंपावर हारुण मुसा खान पठाण (रा. वांजरगाव) हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. ते सोमवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास पेट्रोल पंपाची चार लाख सात हजार 360 रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन दुचाकीवर लाडगावकडे बॅकेत भरणा करण्यासाठी जात होते. त्यावेळी पाठीमागुन दुचाकीवर आलेल्या तिघांनी गाडीचा हॉर्न वाजवून लक्ष विचलित केले. त्यानंतर त्यांची दुचाकी जवळुन चालवत दुचाकीवरील पेट्रोल पंपाच्या टाकीवर ठेवलेली पैशांची बॅग चालत्या गाडीवरुन हिसकावुन पोबारा केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विरगाव पोलिस ठाण्याचे एपीआय शरदचंद्र रोडगे यांच्यासह अन्य पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पंपाचे व्यवस्थापक हारुण पठाण यांना विचारणा केली. याप्रकरणी पठाण यांच्या फिर्यादीवरुन अनोळखी व्यक्तींविरुद्ध विरगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‌पुढील तपास एपीआय रोडगे करीत आहेत‌.