रुग्णाच्‍या नातेवाईकाचे अपहरण,चौघा आरोपींच्‍या मुसक्या आवळल्‍या

औरंगाबाद,११ जून /प्रतिनिधी:- उपचारासाठी घाटी रुग्णालयात आलेल्या रुग्णाच्‍या नातेवाईकाचे अपहरण करुन जीवे मारण्‍याची धमकी देत वीस हजारांची खंडणी मागीतल्याची घटना गुरुवारी दि.१० सकाळी घाटी परिसरात घडली.या प्रकरणात अवघ्‍या काही तासांत तपास करुन बेगमपुरा पोलिसांनी त्‍याच दिवशी रात्री चौघा आरोपींच्‍या मुसक्या आवळल्‍या.

मुकीम फकीरा पठाण (६६), सिकंदर मुकीम पठाण (४०), शाहरुक सिकंदर पठाण (१८, सर्व रा. गल्‍ली नं.५, मिसारवाडी) आणि इश्‍वर विठ्ठल दिशागज (२९, गल्‍ली नं. ६ मिसारवाडी) अशी आरोपींची नावे असून त्‍यांना १४ जूनपर्यंत पोलिस  कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी पी.एच. जोशी यांनी शुक्रवारी दि.११ दिले.

या प्रकरणात विष्‍णु रमेश पवार (२१, रा. चापनेर ता. जाफ्राबाद जि. जालना) याने फिर्याद दिली. त्‍यानूसार, विष्‍णुच्‍या वडीलांना म्युकरमायकोसिसचा आजार झाल्याने त्‍यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. त्‍यांच्‍या देखीभालीसाठी विष्‍णु आणि त्‍याचा मामा कृष्‍णा वाघ हे घाटीत थांबलेले आहेत. ९ जून रोजी सकाळी आठ वाजता कृष्‍णा हे दुध आणण्‍यासाठी पोलीस चौकीसमोरील हॉटेलात गेले होते. त्‍यावेळी एकजण त्‍यांच्‍या जवळ आला व त्‍याने फोन करण्‍यासाठी कृष्‍णा यांच्‍याकडून मोबाइल घेतला व पळून गेला. तत्‍पूर्वी आरोपीने त्‍याचा जूना मोबाइल कृष्‍णाजवळ ठेवला होता. कृष्‍णा यांनी आरोपीच्‍या मोबाइलवर डायल केलेल्‍या शेवटच्‍या मोबाइलवर फोन केला असता, तो आरोपीच्‍या मुलाला लागला. त्‍याने घडलेला प्रकार सांगितला. त्‍यावर मुलाने टी.व्‍ही सेंटर येथे येवून मोबाइल घेवून जाण्‍यास सांगितले. त्‍यानूसार कृष्‍णा तेथे गेले मात्र तेथे कोणीच भेटले नाही.

१० जून रोजी सकाळी १० वाजेच्‍या सुमारास विष्‍णू आणि कृष्‍णा घाटीच्‍या आवारात उभे असतांना कृष्‍णा कडे असलेल्या आरोपीच्‍या मोबाइलवर फोन आला, व त्‍या मुलाने कृष्‍णा यांना पुन्‍हा टि.व्‍ही सेंटर येण्‍याचे सांगितले. मात्र कृष्‍णाने नकार देत मुलालाच घाटीत येण्‍यास सांगितले. त्‍यामुळे चिडलेल्या मुलाने तुम्ही माझ्या वडीलांना मारहाण केली व त्‍यांच्‍याकडून २० हजार रुपेय घेतले असे खोटे बोलून टिव्‍ही सेंटरला येण्‍यास सांगितले. सकाळी ११ वाजता मामा भाचे मेडीसीन विभागाच्‍या इमारतीजवळ उभे असतांना तेथे तीन जण आले. त्‍यांनी कृष्‍णा वाघ यांना बळजबरी मकई गेटच्‍या नेले. तेथे कृष्‍णाला मारहाण करुन जीवे मारण्‍याची धमकी देत विष्‍णूला फोन करुन २० हजार रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या विष्‍णूने फोन पेव्‍दारे आरोपींना १० हजार रुपये दिले. प्रकरणात बेगमपुरा पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील ए.व्‍ही. घुगे यांनी आरोपींकडून गुन्‍ह्यातील पैसे जप्‍त करणे आहे. आरोपींनी फिर्यादीच्‍या मामाचे अपहरण करुन कोठे डांबले होते याचा तपास करणे आहे. फोन पेची रक्कम कोणाच्‍या नावे जमा झाली याचा तपास तसेच आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहे का याचा तपास करणे असल्याने आरोपींना पोलिस  कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.