वैजापूर तालुक्यात सहा गावांमध्ये राष्ट्रीयकृत बँकेच्या नवीन शाखा ; केंद्रीय अर्थमंत्रालय व रिझर्व्ह बँकेची मंजुरी

वैजापूर, २ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील सहा गावांमध्ये राष्ट्रीयकृत बँकेच्या नवीन शाखा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यामध्ये गारज, जरुळ, लोणी खुर्द, लासुरगांव, वाकला व खंडाळा या सहा गावांचा समावेश आहे.

या गावांमध्ये बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा व महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या नवीन बँक शाखांना केंद्रिय अर्थ मंत्रालय व रिझर्व बँकेने मंजुरी दिली आहे.सर्वसामान्यांची कामे सुलभतेने होतील, ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना तसेच स्थानिक व्यापाऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज, शासकीय अनुदान  व इतर व्यवहारांची सुविधा उपलब्ध होईल. राष्ट्रीयकृत बँकेच्या नवीन शाखा मंजूर झालेल्या तालुक्यातील सहा गावांपैकी खंडाळा, लोणी खुर्द  व लासुरगांव ही तीन गावे बाजारपेठेची आहेत.