करंजगावजवळ हायवाची कारला धडक ; कार चालक जागीच ठार

वैजापूर,१८ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-भरधाव हायवाने कारला धडक दिल्याने कारचालक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास नागपूर-मुंबई महामार्गावरील तालुक्यातील करंजगाव शिवारात घडली.अन्वय  मकरंद पाठक 33 (रा.द्वारकानगर, देवूपूर रोड, धुळे ) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.

अन्वय  पाठक हा गुरुवारी सकाळी अल्टो कारने (क्रमांक एमएच 21 सी 2830) नाशिकहून औरंगाबादला एका वास्तू पूजनाच्या कार्यक्रमासाठी जात असताना नागपूर-मुंबई महामार्गावर असलेल्या तालुक्यातील करंजगाव शिवारात समोरच्या बाजूने येणाऱ्या भरधाव हायवाने (क्रमांक एमएच 23 एयु 2279) कारला  जोराची धडक दिली. दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली.  या धडकेत अन्वय   हा जागीच ठार झाला. अपघातानंतर त्याला रुग्णवाहिकेव्दारे शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दरम्यान वैजापूर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक रावसाहेब रावते  करीत आहेत.