वैजापूर शहरात एकाच दिवशी दोन अपघात ; दोघांचा मृत्यू , एक गंभीर जखमी

सासऱ्याला बस स्टँडवर सोडण्यासाठी स्कुटीवर निघालेल्या महिलेला ट्रकची धडक ; महिला जागीच ठार ; सासरा गंभीर जखमी 

वैजापूर,​१०​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर शहरात आज  घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. सासऱ्याला बस स्टँडवर सोडण्यासाठी स्कुटीवर निघालेल्या एका महिलेचा अपघातात जागीच मृत्यू झाला तर या अपघातात सासरा गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैजापूर शहरातील नवीन भाजीमंडी परिसरात आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. प्रतीक्षा राजेंद्र चौधरी (वय 40 वर्ष रा. संभाजीनगर, वैजापूर) असे अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. तर दुसऱ्या अपघातात ट्रकखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. गंगापूर रस्त्यावर मनमोहन ऍग्रो या दुकानाजवळ हा अपघात घडला. 


शहरातील संभाजीनगर भागात राहणाऱ्या प्रतीक्षा चौधरी या आज सकाळी साडे आठच्या सुमारास आपले सासरे  गुलाबराव चौधरी (वय 78) यांना बाहेरगावी जायचे असल्याने त्यांना आपल्या स्कुटीवर (एम.एच.20, आय.डी. 8312)  घेऊन येवला रस्त्यावरील नवीन बस स्टँडवर सोडण्यासाठी निघाल्या असता भाजीमंडई जवळ भरधाव येणाऱ्या ट्रकने ( क्र. एम.पी. 20, एच.बी.8312) त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रतीक्षा चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे सासरे गुलाबराव चौधरी हे गंभीर जखमी झाले.

प्रतीक्षा चौधरी

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघातात जखमी झालेल्या गुलाबराव चौधरी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. प्रतीक्षा चौधरी या स्वतः गाडी चालवीत होत्या. ट्रकची धडक लागून त्या खाली कोसळल्या आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की प्रतीक्षा यांच्या डोक्याचा जागीच चेंदामेंदा झाला होता.अपघातानंतर ट्रक चालक हा आपल्या ट्रकसह तेथून फरार झाला. काही लोकांनी त्याचा पाठलाग केला परंतू तो मिळून आला नाही. तो ज्या दिशेने गेला तेथील नागरिकांना मोबाईलवरून घटनेची माहिती देण्यात आली. या माहितीवरून नागरिकांनी हा ट्रक येवला तालुक्यातील गवंडगांव येथे गणेश रहाणे  रा.चांडगांव) यांच्या मदतीने पकडला. वैजापूर पोलीस ट्रक ताब्यात घेण्यासाठी रवाना झाल्याचे समजते.


शहरात अतिक्रमणे वाढल्यामुळे रहदारीचा प्रश्न निर्माण झाला असून स्टेशन रोड ते येवला नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र नेहमीच पहायला मिळते. नवीन भाजी मंडई परिसरातही गर्दी असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हातगाड्या, दुचाकी व अन्य वाहने उभी असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. शहरातील मुख्य मार्गावरील सर्वच अतिक्रमणे काढण्याची आवश्यकता असून स्थानिक प्रशासनाने यासंदर्भात दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.