नांदूर मधमेश्वर कालव्यात 502 तर पालखेडमधून 90 क्यूसेस पाणी विसर्ग:वैजापूर शहरासह लगतच्या 22 गावांना दिलासा

वैजापूर,२५ जुलै /प्रतिनिधी :- नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर कालव्यासह शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पात अतिरिक्त पाणी सोडण्यात आले आहे. नांदूर मधमेश्वर कालव्यात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून तर पालखेड धरणातील डाव्या कालव्याव्दारे अतिरिक्त पाणी वैजापूर शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पात सोडण्यात आले आहे.  सध्या नांदूर मधमेश्वर कालव्यात 502 तर नारंगी मध्यम प्रकल्पात 90 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून जोपर्यंत नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. तोपर्यंतच हे अतिरिक्त पाणी सुरू राहणार आहे. दरम्यान नारंगीत अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्यामुळे वैजापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

 गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून ती ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे या धरणांतील अतिरिक्त पाणी नाशिक पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीमध्ये सोडले. परिणामी गोदावरी नदीला पूर येऊन गोदाकाठच्या नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील पालखेड धरणही ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या डाव्या कालव्याव्दारे अतिरिक्त पाणी वैजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारंगी मध्यम प्रकल्पात सोडण्यात आले असून सध्या 90 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पालखेडचे पाणी नारंगी मध्यम प्रकल्पाकडे झेपावत असून वैजापूरकरांना केवळ अतिरिक्तच पाणी मिळणार आहे.  दरम्यान पालखेड डाव्या कालव्याच्या चारी क्रमांक 52 मधून खामगाव व उक्कडगाव परिसरातील  बंधारे भरले जातात. येथील नारंगी मध्यम प्रकल्पात 22 जूलै  पाणी सोडण्यात आले होते. नारंगीत 485  दशलक्ष घनफूट पाणी साठवण्याची क्षमता आहे. येवला तालुक्यातून नारंगी प्रकल्पात येणाऱ्या चारीची वहनक्षमता केवळ 40 ते 50 क्युसेक  आहे. त्यामुळे नारंगीत पाहिजे तेवढा जलसाठा होत नाही. कदाचित येत्या काही दिवसांत नाशिक जिल्ह्यात आणखी पाऊस पडला तर नारंगीत पालखेडचे अतिरिक्त पाणी जास्त दिवस सोडले जाऊ शकते. सध्यस्थितीत नारंगी मध्यम प्रकल्पात 09.81 टक्के शिल्लक आहे. त्यामुळे पालखेड धरणाच्या डाव्या कालव्याव्दारे सोडण्यात आलेले अतिरिक्त पाणी जास्त दिवस सुरू राहिल्यास वैजापूरकरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच लाभक्षेत्रातील 22 गावातील पिण्याचा प्रश्न मार्गी लागून सिंचनासाठी या पाण्याचा फायदा होईल. याशिवाय नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर पिकअप वेअरमधून वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी नांदूर मधमेश्वर कालव्याव्दारे अतिरिक्त पाणी सोडण्यात आले आहे. नांदूर मधमेश्वर कालव्यात सध्या 502 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.  नांदूर मधमेश्वर कालवा व शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पात साधारणतः दहा ते बारा दिवस पाणी सुरू राहण्याची शक्यता आहे. सातत्याने पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शहरवासियांना या पाण्यामुळे दिलासा मिळाला आहे. त्यामुळे  पालखेडमधून नारंगीत पाणी सोडल्यामुळे शहरवासियांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे . दरम्यान शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पात अतिरिक्त पाणी सोडण्यात यावे. अशी मागणी आमदार रमेश बोरनारे व माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी नाशिक पाटबंधारे विभागाकडे केली होती.