२ वर्ष जेलमधून बेसन खाऊन आलात, फडफड करू नका, एकेरी उल्लेख करत जरांगे पाटलांनी भुजबळांना सुनावलं

जालना : “छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केल्यानंतर आपण त्यांना सुनावल्यानंतर आमचा विरोध नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. आपणही टीका बंद केली. पण काल पुन्हा त्यांनी आरक्षणाविरोधात उद्गार काढत फडफड केली. सभेला ७ कोटींचा निधी कुठून आला? असा प्रश्न विचारला. मला त्यांना सांगायचंय, माझ्या माय बापाने कापूस विकून १००-५०० जमा केले आणि सभेचा खर्च केला. १०० एकर मैदान आम्ही भाड्याने घेतलंय, विकत घेतलं नाही. लोक तुम्हाला पैसे देत नसतील पण आम्हाला देतात. ज्या गोरगरिब मराठ्याने तुम्हाला मोठं केलं त्यांचंच रक्त पिऊन तुम्ही पैसा कमावला म्हणून तुमच्यावर धाड पडली आणि तुम्ही जेलमध्ये गेलात, अशी बोचरी टीका मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर केली. यावेळी त्यांनी भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीकेचे आसूड ओढले.

मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातील कुणबी प्रमाणपत्रे देण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मनोज पाटील जरांगे यांची आज, शनिवारी विराट जाहीर सभा झाली. मनोज जरांगे यांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये मराठा आंदोलकांमध्ये जान भरली. यावेळी त्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांना लक्ष्य केलं. तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांनाही समज द्या, असा इशारा त्यांनी फडणवीस यांचं नाव घेऊन दिला.