एकतर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठ्यांची विजय यात्रा निघेल-मनोज जरांगे पाटील

सरकारच्या हातात दहा दिवस, मराठ्यांना आरक्षण द्या अन्यथा..

आंदोलन शांततेतच होणार पण पुढील आंदोलनाची दिशा २२ ऑक्टोबरला ठरवणार

जालना ,१४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी रणशिंग फुंकले आहे. आज (१४ ऑक्टोबर) जालन्याच्या आंतरवाली सराटीमधून शिंगे फडणवीस सरकारला निर्णायक इशारा दिला आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी एकतर माजी अंतयात्रा निघेल नाहीतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजयी यात्रा निघेल, असं म्हणत एल्गार केला. आज आंतरवालीतील सभेत जरांगे यांनी अतिविराट सभेसमोर सरकारला अल्टिमेटम दिला. दहा दिवसांपेक्षा जास्त वेळ वाट पाहण्याची आमची तयारी नाही. असं देखील जरांगे यांनी सरकारला ठणाकावून सांगितलं.

मनोज जरांगे बोलाताना म्हणाले, व्यावसायावर आधारित जाती निर्माण झाल्याचं कायदा सांगतो. शेती व्यवसायामुळे कुणबी प्रमाणपत्र दिली, असं म्हणत त्यांनी राज्याचे पंतप्रधान आणि देशाचे पंतप्रधान यांनी विनंती केली. ते म्हणाले की, सर्वांनी मिळून मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावाला. मराठा समाजाला ओबीसींमध्ये समाविष्ट करुन कुणबी प्रमाणपत्र द्यावं. गोरगरीब मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी केंद्रासह राज्याने तातडीने निर्णय घ्यावा असं जरांगे म्हणाले.

ते पुढे बोलताना म्हणाले की, मराठा समजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा आणि समावेश केल्याचा निर्णय जाहीर करावा. देशाचे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह यांच्या सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य सरकारला या कोट्यावधी मराठा समाजाकडून हात जोडून विनंती करुन सांगतो की, सगळ्यात मोठ्या समाजाची विनाकारण हालअपेष्ठा करु नका, अशी जाहीर विनंती त्यांनी केली. मराठा समाजासाठी गठित केलेल्या समितीचं काम बंद करा. तुमचं आमचं ठरल होतं. चार दिवसात कायदा पारित होणार नाही. एक महिन्याचा वेळ द्या. आधार घेऊन कायदा पारीत करतो. समितीला पाच हजार पानांचा पुरावा मिळाला आहे. त्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश करा, अशी मागणी त्यांनी केली.

‘संपूर्ण जगाला आणि देशाला मराठा समाज शांततेचा संदेश देणार आहे. इतक्या मोठ्या संख्येने मराठा समाज आज येथे आला आहे. मराठा समाज जसा शांततेत येथे आला तसाच शांततेत जाईलही. पण, आजपासून सरकारच्या हातात दहा दिवस आहेत. आम्हाला मात्र दहा दिवसांनंतर आरक्षण पाहिजे कारण, आरक्षण आमच्या हक्काचे आहे. या समाजाच्या वेदना आहेत, ही सभा नाही. ही स्वतःच्या लेकरांची वेदना आहे. आज भविष्य आणि अस्तित्व दोन्ही धोक्यात आलंय त्यांच्या मुलांचं. प्रचंड पैसा खर्च करूनही आज समाजातील मुलं बेरोजगार म्हणून जगत आहेत. प्रचंड शिकलेला असतानाही आज मराठा समाज अडचणीत आला आहे. एक टक्का कमी मिळाला तरी नोकरी मिळत नाही. म्हणून ही सामान्य मराठ्यांची लढाई असून ही लढाई आम्हाला जिंकायची आहे’, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील  यांच्या सभेसाठी उपस्थित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय… राष्ट्रमाता जिजाऊ माता की जय… मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो… घोषणांनी संपूर्ण सभास्थळ दुमदुमून गेलं आणि मनोज जरांगे पाटलांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

भाषणाला सुरुवात करण्यापूर्वीच जरांगेंनी व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना खाली पाठवले आणि सर्वांना सारखा न्याय असे ठणकावून सांगितले. जरांगे पाटील म्हणाले की, व्यासपीठावरचे सगळे खाली जा, सगळ्यांना सारखा न्याय बाकीचे खाली बसलेत आणि तुम्ही इथं वर, मग मी जाईन हा तिथं, मी मराठ्यांत जात असतो मग खाली… असं सांगत मनोज जरांगे पाटलांनी सर्वांना व्यासपीठावरुन थेट खाली पाठवले.

हिंदवी स्वराज्याचे राजे छत्रपती शिवरायांना वंदन करुन आणि उपस्थितांना प्रमाण करुन मनोज जरांगेंनी भाषणाला सुरुवात केली. मराठा समाज एक होत नाही, असे बोलणाऱ्यांच्या आज एकत्र जमून मराठ्यांनी मुस्काटात हाणली. कोण म्हणतो मराठा एक होत न्हाय… उपस्थितांनी एकत्र मनोज जरांगेंच्या सुरात सूर मिसळला.

जर १० दिवसात आरक्षण मिळालेले नाही तर पुढे ही आंदोलन शांततेतच होणार पण पुढील आंदोलनाची दिशा २२ ऑक्टोबरला ठरवणार आणि पुन्हा एकदा शांततेत आंदोलन करत असताना आमरण उपोषण करणार असल्याचे जरांगे यांनी यावेळी सांगितले. तसेच एकतर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठ्यांची विजय यात्रा निघेल, असा एल्गार त्यांनी यावेळी केला.

१०० एकरच्या मैदानात मनोज जरांगेंची सभा आयोजित करण्यात आली होती. काल (शुक्रवारी) रात्रीपासूनच सभास्थळी मराठा आंदोलकांनी हजेरी लावली होती. सभेचं मैदान गर्दीनं गजबजून गेलं आहे. सभा सुरू होण्याआधी जरांगे पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.

ते पुढे म्हणाले, ‘आमची भावना जर सरकारला समजत नसेल तर त्यांनी काय समजावं. आंदोलन शांततेत होणार त्यात काही बदल होणार नाही. पण, सरकारला आरक्षण द्यावचं लागेल. येत्या दहा दिवसात सरकारने आरक्षण दिलं नाही तरी शांततेचा भंग होणार नाही. आरक्षण दिलं नाही तर पुढील भूमिका ठरवू. मराठा समाज शांत आहे. मायबाप समाजावर माझा विश्वास आहे. शांततेत आंदोलन केलं म्हणूनच आज इथपर्यंत पोहोचलो. आम्ही काहीही झालं तरी आरक्षण घेणार हे ठामपणे सांगतो आहे. सध्या शिंदे समिती मराठवाड्यात फिरत आहे. सरकारचं म्हणणं आहे की पाच हजार पुरावे पुरेसे नाहीत. माझं त्यांना विचारणं आहे की तुम्हाला काय ट्रकभर पुरावे हवेत का? एक पुरावा सापडला तरीही पुरावा. आयोग किंवा समिती स्थापन केली तर ते तरी पाच हजार पानांचा अहवाल देतात का?’, असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला आहे.