लासूरगाव येथे किरकोळ भांडणाच्या वादातून तरुणाचा खून ; गुन्हयातील आरोपी अट्टल चोर

वैजापूर ,२८ एप्रिल  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील लासुरगाव येथे शिवना नदीपात्राजवळ उघडकीस आलेल्या खुनाच्या घटनेत पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना ताब्यात घेतले असून जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्यांनी कृष्णा पोपट हरिश्चंद्रे (27 वर्ष) याचा डोक्यात दगडाने वार करुन खून केल्याचे उघड झाले आहे.

कृष्णा पोपट हरिश्चंद्रे

राजु मुस्ताक पठाण (25 वर्ष) व जुनेद मुस्ताक पठाण (24 वर्ष) अशी त्यांची नावे असून ते गंगापूर तालुक्यातील भानवाडी (लासुर स्टेशन) येथील रहिवासी आहेत. हे दोघेही अट्टल गुन्हेगार असून चोरी व लुटमारीच्या आरोपाखाली जेलमध्ये होते. जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा गुंडगिरी सुरु केली. लासुरगाव येथील यात्रेत त्यांनी बाहेरुन आलेल्या दुकानदारांशी दमदाटी सुरु केली. त्यामुळे कृष्णा हरिश्चंद्रे यांच्यासह लासुरगावच्या मुलांसोबत राजु व जुनेद यांचे भांडण झाले.

दरम्यान, कृष्णा हा रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घरी आला व जेवण करुन पुन्हा यात्रेत जातो म्हणून बाहेर पडला. एक वर्षांपुर्वी मोबाईल हिसकावण्याच्या कारणावरुन कृष्णा व राजु पठाण सोबत भांडण झाले होते. त्यातच लासुरगावच्या यात्रेत दोन्ही भावांचे पुन्हा कृष्णासोबत भांडण झाल्याने दोघांनी कृष्णाचा काटा काढायचा ठरवले. कृष्णा रात्री बारानंतर घराबाहेर आल्याने त्याचा घात झाला. राजु व जुनेद या दोघांनी दगडाने ठेचून त्याचा खून केल्याचे समोर आले आहे.‌ मयत कृष्णा हा चालक होता. दरम्यान, पोलिसांना याबाबत सुगावा लागताच खुनाची घटना उघडकीस येण्याच्या काही तासांतच पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी मयत कृष्णा याचा भाऊ सुदाम हरिश्चंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.