शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी राज्य आदर्श शिक्षक समितीच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन

वैजापूर,२९ मार्च  /प्रतिनिधी :-राज्य आदर्श शिक्षक समितीच्यावतीने शिक्षकांच्या विविध प्रकारचे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधले जावे यासाठी 31 मार्च रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर दुपारी 2 ते 5.30 या वेळेत तीव्र धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 
गेली अनेक वर्षे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे शिक्षकांचे शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक , पदवीधर विषय गणित विज्ञान शिक्षक पदोन्नती, निवड श्रेणी, डिसीपीएस धारक व जीपीएफ धारक हिशोब, मासिक वेतन, सेवानिवृत्त शिक्षक वेतन, चटोपाध्याय लाभ, विविध पुरवणी देयके , बिंदू नामावली, शिक्षक कर्मचारी कल्याण निधी व्याजासह परत करणे, सातवा वेतन आयोग, सेवापुस्तिका पडताळणी, गोपनीय अहवाल प्रत न देणे, आगाऊ वेतनवाढीचा विषय अशा अनेक न्याय हक्काचे  व जिव्हाळ्याचे प्रश्नांची सोडवणूक करण्यास औरंगाबाद येथील प्रशासन अपयशी ठरले आहे असा आरोप संघटनेने निवेदनात केला आहे. 
राज्यातील इतर जिल्ह्यातील प्रश्न वेळेत सुटत आहेत. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रश्नांची कायमस्वरूपी ओरड सुरू आहे. प्रश्न सुटावे म्हणून संघटनांनी वारंवार पाठपुरावा केला परंतु, प्रशासन सतत उदासीन दिसून येत असल्याने जिल्हा परिषदेच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ आदर्श शिक्षक समितीच्यावतीने संस्थापक दिलीप ढाकणे, राज्य महासचिव अंजुम पठाण, राज्य नेते जयाजी भोसले, महिला आघाडी राज्य नेत्या सुषमा राऊतमारे , जेष्ठ नेते के.सी.गाडेकर, राजेंद्र नवले, बाजीराव ताठे*यांच्या मार्गदर्शनाखाली तर जिल्हा अध्यक्ष संतोष बरबंडे यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदर्श शिक्षक समितीच्या वतीने देण्यात आले आहे. विराट लक्षवेधी धरणे  आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षक शिक्षिका यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आदर्श शिक्षक समिती जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हा अध्यक्ष संतोष बरबंडे, माध्यमिक विभाग प्रमुख किशोर बिडवे, महिला आघाडी प्रमुख बबिता नटवटे, मराठवाडा  अध्यक्ष पुष्पा दौड, पद्मा वायकोस, सुरेखा पाथ्रीकर, योगिता गोरे,  सुनंदा कुंभार, भारती साळुंके, सुनंदा बनसोडे, साधना शेवंते, छाया वालतुरे, सुनिता कुळधर, प्रज्योती जानेकर आदींनी केले आहे.