वैजापूर येथे लग्नासाठी आलेल्या शिक्षिकेचा नेकलेस व वधूचा मोबाईल चोरीस

वैजापूर,१६ एप्रिल  /प्रतिनिधी :- लग्नासाठी आलेल्या शिक्षिकेचा दोन तोळ्याचा सोन्याचा नेकलेस व वधुचा मोबाईल असा एक लाख चार हजार रुपये किमतीचा ऐवज लग्नात चोरी झाल्याची घटना शुक्रवारी(ता.15) शहरातील सुरज लॉन्स येथे उघडकीस आली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सीमा दगडे (रा. औरंगाबाद) या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापिका ज्योती लांडे यांच्या मुलीच्या लग्नासाठी त्या गिता मांडले या मैत्रिणीसोबत वैजापूर येथील स्टेशन रस्त्यावर असलेल्या सुरज लॉन्स येथे आल्या होत्या. परत औरंगाबादला रिक्षा व रेल्वेने जायचे असल्याने त्यांनी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कार्यालयातच गळ्यातील एक लाख रुपये किंमतीचा नेकलेस  पर्समध्ये ठेवला. मात्र रेल्वेमध्ये बसल्यानंतर पर्समध्ये बघितले असता सोन्याचा नेकलेस आढळुन आला नाही. दरम्यान वधुचाही चार हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीस झाल्याचे लग्नात उघड झाले. याप्रकरणी सीमा दगडे यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय खोकड करीत आहेत