“पुढच्या वर्षी लवकर या” च्या गजरात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

वैजापूर,​१०​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर शहरात “श्री” विसर्जन मिरवणूक आज उत्साहात व शांततेत पार पडली. कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सव होऊ शकला नाही. यावर्षी मात्र  मोठ्या उत्साहात ढोलताशांचा गजर व डीजेच्या दणदणाटात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. सकाळी अकरा वाजेपासूनच “श्री” विसर्जनास सुरुवात झाली.

सुरुवातीला माजी आमदार स्व.आर.एम.वाणी यांनी स्थापन केलेल्या शहरातील श्री. स्वामी समर्थ सांस्कृतिक मंडळाने आ.रमेश पाटील बोरणारे, नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेना नेते आसाराम पाटील रोठे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत यांच्याहस्ते गणपतीची पूजा व वृक्षारोपण करून उंट, घोडे व लेझीम पथकासह पाटील गल्ली येथून मिरवणुकीला सुरुवात केली. अत्यंत शिस्तबध्दपणे व मुलींच्या लेझीम पथकासह काढण्यात आलेल्या मंडळाच्या या गणपतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.


“श्री” विसर्जन मुख्य मिरवणुकीस सायंकाळी सात नंतर प्रारंभ झाला. शहरातील 50 गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली होती. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. ढोल ताशांच्या गजरात तसेच डीजेच्या दणदणाटात गणरायाला निरोप देण्यात आला. परंपरागत विसर्जन मार्ग असलेल्या गांधी रोड व्यतिरिक्त यावर्षी पहिल्यांदाच संकट मोचन हनुमान मंदिराकडून गणेश मंडळांना मार्ग खोलून दिल्याने या मार्गावरून येणाऱ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण होऊन मिरवणूक काही काळ थांबली होती. किरकोळ वाद वगळता मिरवणूक शांततेत पार पडली.


श्री.गणेश महासंघाच्यावतीने अध्यक्ष काशीनाथ गायकवाड, सचीव धोंडिरामसिंह राजपूत, घनश्याम वाणी, जफर खान, विनोद गायकवाड, बापू गावडे,बाबासाहेब गायकवाड यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले.

मिरवणुकीत आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, गणेश महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ गायकवाड, उपाध्यक्ष धोंडिरामसिंह राजपूत, सचिव जफर खान, घनश्याम वाणी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश बोथरा यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक सहभागी झाले होते.कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.जिल्हा पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया व उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार राहुल गायकवाड, पालिकेचे मुख्याधिकारी बी.यु. बिघोत, गोपनीय शाखेचे संजय घुगे हे मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते. पुढे जाण्यावरून निर्माण झालेला किरकोळ वाद वगळता मिरवणूक उत्साहात व शांततेत पार पडली.