रस्त्याच्या ठेकेदाराला ठाकरे सरकारने दिले ऑक्सिजन प्लांटचे काम-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मांडली आरोपांची जंत्री

माझे कुटुंब माझी जबाबदारी, सर्व टेंडर आपल्या स्वकीयांच्या घरी

कोव्हिड काळातील महाविकास आघाडी सरकारचे महाघोटाळे उघड

काल्पनिक रुग्ण आणि, काल्पनिक डॉक्टर दाखवून जनतेचा पैसा लुटला

नागपूर,२० डिसेंबर / प्रतिनिधी :-रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीला कोव्हिड काळात ऑक्सिजन प्लान्टचे काम देवून आरोग्य व्यवस्थेला ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या महाविकास आघाडी  सरकारने रस्त्यावर आणले आले. २७० कोटींची ५७ कंत्राट देऊन स्वतःचे खिसे भरले. कोविड हॉस्पिटल उभारणीचे व  चालविण्याचे कंत्राट त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या नातेवाईकांना दिले. काल्पनिक रुग्ण आणि काल्पनिक डॉक्टर दाखवून जनतेचा पैसा लुटला अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये कसे घोटाळे झाले, याचा पाढाच वाचला.

मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांनी तर  प्रत्येक घोटाळ्यांची फाईल पुराव्यानिशी सादर करण्याचे सांगितले.ऑक्सिजन प्लँटची सुरुवात झाली कपड्याचे दुकानतून, रोमिन छेडा नावाच्या व्यावसायिकेचा गंजलेला ऑक्सिजन प्लँट दिल्याने फंगसचा प्रादुर्भाव झाला. त्यात काही लोकांचा जीव गेला. काहींच्या डोळ्यांना त्रास झाला. हे सर्व रेकॉर्डवर असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला. यापूर्वीच्या सरकारचा केवळ पैशाशी मतलब होता असे ते म्हणाले.

यापूर्वीचे सरकार टेंडर तिथे सरेंडर असे असल्याचा टोला त्यांनी लगावला. कोविड काळात सर्वसामान्य मुंबईकर मात्र आपल्याला कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत होता. माझे कुटुंब माझी जबाबदारी, सर्व टेंडर आपल्या स्वकीयांच्या घरी, बाकी जनता फिरते दारोदारी अशी अवस्था होती, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर केली.

रस्ते बनवणाऱ्या कंपनीला ऑक्सिजन प्लँट उभारण्याचे काम देऊन या मंडळींनी संपूर्ण आरोग्यवस्थेलाच रस्त्यावर आणलेल्या हे मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. कुणाच्या खात्यात किती रक्कम जमा झाली. धनादेशाने व्यवहार झाले. त्याची संपूर्ण माहिती देण्यात येईल असे ते म्हणाले.

लाईफलाईन हॉस्पिटलमधील घोटाळ्याचा त्यांनी उल्लेख केला. लाईफ लाईन नाही तर ही डेथलाईन असल्याचा आरोप त्यांनी केला. कोविड हॉस्पिटल उभारणीमध्ये चालवण्याचे कंत्राट घेणाऱ्या सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटलने तर लुटालुटीचा उच्चांक गाठलेला आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. या संपूर्ण प्रक्रियेत काल्पनिक रुग्ण दाखवले, काल्पनिक डॉक्टर दाखवले. त्यांचा पगार काढला. रुग्णांना औषधं वितरण केल्याचे दाखवले. त्यातून मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घातल्याचा घणाघाती आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. या दौलतीतून कोणाची घरे भरण्यात आली. कोणाच्या तुमड्या भरल्या हे समोर येईल, असा इशारा त्यांनी दिला.

कोविड काळात कामगार आणि गोरगरीब वर्गाला मोफत खिचडी वाटपाचे कंत्राट देण्यात आले होते. ३३ रुपयांत ३०० ग्रॅम खिचडी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुळ कंत्राटदाराने मापात पाप केले. त्यांनी दुसऱ्या कंपनीला १०० ग्रॅम खिचडीचे कंत्राट दिले. गोरगरिबांचा घास हिरावला. ३०० ग्रॅम खिचडीऐवजी १०० ग्रॅम खिचडीचे वाटप करण्यात आले. या कंत्राटदाराचे किचन गोरेगाव येथील एका हॉटेलचा पत्ता दाखविण्यात आला. हे त्या हॉटेल मालकाला पण माहिती नव्हते, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.