राज्यातून गोवरचे समूळ उच्चाटन करणार – मंत्री डॉ.तानाजी सावंत

विधानसभा प्रश्नोत्तरे

नागपूर ,२२ डिसेंबर/ प्रतिनिधी :-राज्यातील 142 ठिकाणी तसेच शहरी भागात गोवर आजाराचा उद्रेक झाला आहे. ठाणे, भिवंडी, मालेगाव, वसई विरार अशा विविध ठिकाणी  उपाययोजना करण्यासाठी कृती दलाची (टास्क फोर्स) निर्मिती केली आहे. या माध्यमातून  विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्य विभागाने लसीकरणाला प्राधान्य दिले आहे. पुढील दहा ते पंधरा दिवसांत गोवर आजाराची रुग्ण संख्या 100 टक्के आटोक्यात आणू, असे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले .

राज्यात साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपायोजनांबाबत सदस्य रमेश कोरगावकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री डॉ. सावंत बोलत होते.

मंत्री डॉ. सामंत म्हणाले की,आरोग्य विभाग धोरणात्मक निर्णय घेऊन गतीने काम करत आहे. संबंधित योजना जनतेपर्यंत पोहोचतात की नाही यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन त्या विभागातील तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येईल. या समितीच्या मार्गदर्शनाखाली लोकांचे आरोग्य कसे सुधारेल, याबाबत उपाययोजनांसाठी महिनाभरात धोरण आणण्यात येईल.

या चर्चेत सदस्य सर्वश्री योगेश सागर, अबू आझमी, ॲड. आशिष शेलार, यामिनी जाधव, रइस शेख यांनी सहभाग घेतला.

आरोग्य विभागात भरती प्रक्रिया

आरोग्य विभागात भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही.बालकांच्या लसीकरणावर कृती दलाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. या पथकाला गोवरचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे निर्दशनास येत आहे. तसेच घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य पथकांची संख्या वाढविण्यात आली आहे.

उंदीर मारण्यासाठी केलेल्या खर्चाची चौकशी

मुंबई महानगरपालिकेने उंदीर मारण्यासाठी केलेल्या खर्चाची बाब गंभीर असून याबाबत समिती नेमून चौकशी केली जाईल, असेही मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

मिशन वात्सल्य योजनेंतर्गत बालसंगोपन अनुदानात वाढ करणार – मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विधानसभेत घोषणा

राज्यात कोरोना कालावधीत विधवा झालेल्या महिलांची उपजीविका आणि अनाथ बालकांसाठीच्या बालसंगोपन योजनेच्या सहायक अनुदानामध्ये २ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक असून येत्या तीन महिन्यांत सदरहू रक्कम वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली.

राज्यात मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत अनुदानात वाढ तसेच पंडिता रमाबाई व्याजमाफी योजना अंमलात आणण्याबाबत सदस्य ॲड.आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री श्री. लोढा बोलत होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, कोरोना संसर्गाने कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने विधवा महिलांची उपजीविका आणि अनाथ बालकांच्या संगोपनासाठी मिशन वात्सल्य योजना सुरु करण्यात येणार आहे. बालसंगोपन आणि महिलांच्या रोजगारासाठी पंडिता रमाबाई व्याजमाफी योजना अंमलात आणून या योजनेअंतर्गत मिळणारे सहायक अनुदान १ हजार १०० रुपयांवरून २ हजार ५०० करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. त्यानुसार ही योजना अंमलात आणण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे.

बालसंगोपन योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाबाबत वाढ करण्याच्या अनुषंगाने सर्व विभागांची सहमती मिळाली आहे. या योजनेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विभागाच्या वतीने राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये या योजनेबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विधवा महिलांचे बचत गट बनवून या गटांना १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार असून त्याचे व्याज शासनाच्या माध्यमातून अदा करण्यात येईल, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

सध्या राज्यात कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्यांचे आई-वडील मृत्यू पावले आहेत, अशी एकूण 847 प्रकरणे आहेत. तसेच माता किंवा पिता यांच्यापैकी एक मृत्यू पावले आहे अशी एकूण 23 हजार 533 प्रकरणे आहेत. एकूण 24 हजार 380 पैकी 1100 रुपये प्रमाणे 19 हजार प्रकरणात लाभ देण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणे लवकरच निकाली काढण्यात येतील. कोरोनात ज्यांनी माता किंवा पिता गमावले आहेत  त्यांच्यासाठी बचत गट स्थापन  करण्यात येणार आहेत. कोरोना काळात ज्याचे माता किंवा पिता यापैकी कोणी मृत्यू पावला असेल अशा परिवारातील ज्यांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे, त्यांच्या वरील व्याज कमी करण्याबाबत बँकेशी पत्रव्यवहार करण्यात येईल,  असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या चर्चेत सदस्य सर्वश्री संजय गायकवाड, मोहन मते, राम सातपुते यांनी सहभाग घेतला.