बेगमपुरा पोलिसांनी कारवाई करुन ३४ किलो गांजा हस्‍तगत

औरंगाबाद,५ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- विद्यापीठ गेटजवळील आम्रपाली नगरात बेगमपुरा पोलिसांनी कारवाई करुन ३४ किलो गांजा हस्‍तगत केला होता. तो गांजा आरोपी सचिन त्रिभूवन (रा. हर्षनगर) याने तेलंगणा राज्यातून आणल्याची कबुली अटक आरोपींनी दिली. दरम्यान आरोपींच्‍या कोठडीत ७ सप्‍टेंबरपर्यंत वाढ करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.बी. पाटील यांनी सोमवारी दि.५ दिले.

बेगगमपुरा पोलिसांनी मिळालेल्या माहिती आधारे कारमधून गांजाची तस्‍करी करणाऱ्या कार चालक सुरेश रावसा‍हेब सागरे (२४, रा. गल्ली क्रं. ९, सुरेवाडी जाधववाडी) याच्‍यासह सागर भाऊसाहेब भालेराव (२५, रा. वाघलगाव ता. फुलंब्री), संदेश दिलीप ठाकुर (२४, रा. मयुरपार्क) आणि शंकर भिमराव काकडे (२४, रा. आम्रपालीनगर, विद्यापीठ गेट) या चौघांना बेड्या ठोकून त्‍यांच्‍याकडून सुमारे ११ लाख ३० हजार ४५८ रुपये किंमतीचा ऐवज हस्‍तगत करण्‍यात आला होता. पोलीस कोठडी दरम्यान आरोपींनी सचिन त्रिभूवन याने तेलंगणाच्‍या सुर्यापेठ ते भद्रचिल्लम रोडवर सिटर रिक्षातून शिब्बु नावाच्‍या व्‍यक्तीकडून गांजा आणल्याची कबुली दिली.

दरम्यान आरोपींच्‍या कोठडीची मुदत संपल्याने त्‍यांना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील निता किर्तीकर यांनी आरोपी सचिन त्रिभूवन आणि शिब्बु नावाच्‍या व्‍यक्तीचा शोध घेवून त्‍यांना अटक करायची आहे. आरोपींना गुन्‍ह्यात कोणी मदत केली काय, आरोपींनी आणखी गांजा कोठे लपून ठेवला आहे का याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींच्‍या कोठडीत वाढ करण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.