शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाने राज्यात व्याख्यानमाला स्पर्धा- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाने राज्यात व्याख्यानमाला स्पर्धा- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

रत्नागिरी,४ डिसेंबर /प्रतिनिधी:- शिवचरित्र राज्यातील प्रत्येक युवकास माहिती असणे आवश्यक आहे, यासाठी राज्यातील 13 विद्यापीठांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाने व्याख्यानमाला स्पर्धा घेण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

उच्च तंत्रशिक्षण विभागातर्फे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला.  येथील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते.  शिवशाहीरांनी शिवजागर केला त्यांची परंपरा पुढे सुरु रहावी यासाठी प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांचे व्याख्यान यावेळी झाले.

कार्यक्रमात बोलताना सामंत म्हणाले की, राज्यात वक्तृत्वातून देखील विकास शक्य आहे याची ओळख प्रा. बानगुडे यांच्या वक्तृत्वशैलीतून होते.  अशीच परंपरा पुढेही चालू राहिली पाहिजे याचसाठी राज्यात 13 विद्यापीठात अशी स्पर्धा सुरु करण्यात येत आहे.

याप्रसंगी प्रा. बानगुडे यांनी शिवचरित्र विषयावर व्याख्यान देताना छत्रपती शिवाजी महाराजांचे युध्दकौशल्य, गनिमी कावा तसेच सांस्कृतिक पुढाकार, त्यांची आरमाराची दूरदृष्टी यावर आपल्या खास शैलीत शिवचरित्र उलगडून दाखवले.

शिवाजी महाराज त्यांच्या काळात जगातले सर्वोत्तम सेनापती होते आणि त्यांनी अनेक राष्ट्रीय चारित्र्याची माणसे घडविली असे प्रा. बानगुडे म्हणाले.

कार्यक्रमाच्या आरंभी बाबासाहेब पुरंदरे यांचा जीवनपट उलगडून दाखविणारा एक वृत्तपट दाखविण्यात आला.  त्यानंतर श्रध्दांजलीचा कार्यक्रम झाला.  जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील नागरिकांची कार्यक्रमास उपस्थिती होती.