दोन लाख ५२ हजार ४८६ रुपयांचा गुटखा आणि सुंगधित तंबाखू हस्‍तगत

औरंगाबाद,२२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-जुना मोंढा पसिरातील सौदागर ट्रेडींग किरणा दुकानावर क्रांतीचौक पोलीस आणि अन्‍न व औषध प्रशासनाच्‍या वतीने संयुक्त कारवाई करुन दोन लाख ५२ हजार ४८६ रुपयांचा गुटखा आणि सुंगधित तंबाखू हस्‍तगत केली. ही कारवाई शनिवारी दि.२० सायंकाळी करण्‍यात आली.

सय्यद अमजद सय्यद युसुफ (४६, रा. दलालवाडी, पैठणगेट) असे अटक करण्‍यात आलेल्या व्‍यापार्याचे नाव असून त्‍याला २३ ऑगस्‍टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.व्‍ही. चरडे यांनी रविवारी दि.२१ दिले.

प्रकरणात अन्‍न व औषध प्रशासनाच्‍या अधिकार्याने फिर्याद दिली. त्‍यानूसार, २० ऑगस्‍ट रोजी सायंकाळी जुना मोंढा पसिरातील मोतीकारंजा रोडवरील सौदागर ट्रेडींग किरणा दुकानात गुटख्‍याची विक्री होत असल्याची माहिती क्रांतीचौक पोलीस ठाण्‍याचे उपनिरीक्षक विकास खटके यांना मिळाली. माहिती आधारे क्रांतीचौक पोलीस आणि अन्‍न व ओषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करून दुकानमालक सय्यद अमजद याला अटक केली. तसेच दुकानातून दोन लाख ५२ हजार ४८६ रुपये किंमतीचा गुटखा, सुंगधित तंबाखू हस्‍तगत करण्‍यात आली. प्रकरणात क्रांतीचौक पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी आरोपीने गुटखा कोठून व कोणाकडून आणला, आरेापीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय, आरोपीने आणखी गुटखा,सुंगधित तंबाखूचा साठा केलेला असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.